शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यभरातील शिवसैनिकांशी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यांचं खासदार संजय राऊत यांनी समर्थन केलं आहे. भाजपाला शिवसेनेनं महाराष्ट्रामध्ये जमीनीपासून आकाशापर्यंत नेल्याचं सांगताना ठरवलं असतं तर आज देशात शिवसेनेचा पंतप्रधान असता असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
“भाजपाला आम्ही महाराष्ट्रामध्ये जमीनीवरुन आकाशापर्यंत पोहचवलं, हे सर्वांना माहितीय,” असं राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय. “आम्ही युतीचा धर्म कायम पाळला. इतिहास याला साक्ष आहे. काल उद्धव ठाकरेंनी आपली खंत व्यक्ती केली ती योग्य आहे,” असंही राऊत म्हणाले.
भाजपासोबत गेलेल्या प्रत्येक पक्षाला शिवसेनेप्रमाणेच वागणूक देण्यात आल्याचा उल्लेख राऊत यांनी केला. “ही केवळ शिवसेनेची गोष्ट नाहीय. तर जे चांगल्या हेतूने भाजपासोबत गेलेत त्या सर्व पक्षांचे हेच हाल झाले आहेत. अकाली दल असो, गोव्यात एमजीपी असो किंवा हरियाणा असो, चंद्रबाबू नायडू असो, जयललिता असो सर्वांना त्याची किंमत चुकवावी लागलीय. मात्र शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे ज्याने त्यांना किंमत चुकवावी लागेल असं काम केलंय,” असं राऊत म्हणाले.
नक्की वाचा >> “…तर नाय मातीत गाडलं, लोळवलं तर शिवसेना आपलं नाव सांगणार नाही”; शिवसेनेचं भाजपाला थेट आव्हान
“देशभरामध्ये भाजपाला वाढण्याची संधी शिवसेनेनं दिली. शिवसेना महाराष्ट्राबाहेर वाढली नाही. आता भाजपाच शिवसेनेला डोळे दाखवू लागल्यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारण्यात आला असता राऊत यांनी बाळासाहेबांनी देशभरामध्ये शिवसेना विस्ताराचं मनावर घेतलं असतं तर चित्र वेगळं असतं असं राऊत म्हणाले.
“बाबरीनंतर शिवसेनेची आणि बाळासाहेब ठाकरेंची उत्तर भारतामध्ये एक लाट होती. त्यावेळी आम्ही उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार, पंजाब अगदी जम्मू काश्मीरपर्यंत निवडणूक लढलो असतो तर काल जसं उद्धव ठाकरेंनी सांगितलं त्याप्रमाणे देशात आमचा पंतप्रधान असता. मात्र आम्ही हे सारं भाजपासाठी सोडलं. तुम्ही देशात पुढे व्हा आम्ही महाराष्ट्रात काम करु, असं बाळासाहेबांचं भाजपाप्रती धोरण होतं. हा बाळासाहेबांचा मोठेपणा होता. त्यांचं मन मोठं होतं. ते खरे हिंदूहृदयसम्राट होते,” असं राऊत म्हणाले.
नक्की वाचा >> “तसं पाहिलं तर मी सुद्धा गुन्हेगार आहे, मी तरी कुठे…”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली खंत
“एक हिंदू पार्टी देशात वाढवण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्यात अडचण ठरणार नाही अशी बाळासाहेबांची भूमिका होती. आम्ही एका विचारसणीचे लोक आहोत. तुम्ही मोठे असो आम्ही छोटे असो विचार वाढत राहिला पाहिजे, असाच बाळासाहेबांचा कायम विचार राहिला,” असंही राऊत यांनी यावेळी म्हटलं.