गुजरातमधील पटेल समाजाचा ‘अन्य मागासवर्गीय समाजा’त समावेश करून आरक्षण दिले नाही तर २०१७च्या विधानसभा निवडणुकीत ‘कमळ’ उमलणार नाही, असा सज्जड इशारा आंदोलनाचे म्होरके हार्दिक पटेल यांनी मंगळवारी अहमदाबादमध्ये लाखो लोकांच्या साक्षीने ‘महाक्रांती रॅली’त दिला. गुजरातमध्ये राजकीय नाडय़ा हातात असलेल्या पटेल समाजाच्या या आंदोलनाने सरकारचे धाबे दणाणले. सरकारने आरक्षणाबाबत असमर्थता व्यक्त करतानाच चर्चेचा प्रस्ताव दिला, पण हार्दिक यांनी तो धुडकावला. पोलिसांनी रात्री काही वेळापुरते त्यांना ताब्यात घेताच अहमदाबाद आणि सुरतमध्ये हिंसाचार भडकला आहे.
अवघ्या २२ वर्षीय हार्दिक यांच्या या आंदोलनाने भाजपच्या गोटात चिंता वाढली आहे. हार्दिक यांनी मंगळवारी अहमदाबादच्या ‘जीएमडीसी’ मैदानावर धरणे आंदोलन सुरू केले तेव्हा समाजातील तीन लाखांहून अधिक लोकांनी गर्दी केली. आरक्षणाचे निवेदन स्वीकारण्यासाठी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल २४ तासांत आल्या नाहीत तर आपण उपोषण सुरू करू, असा इशारा हार्दिक यांनी दिला आणि सायंकाळी त्यांनी उपोषण सुरू केल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांची पूर्वपरवानगी न घेता हार्दिक यांनी मैदानाचा वापर केल्यावरून ही अटक झाली असून त्यांना शाहीबाग येथील पोलीस मुख्यालयात नेण्यात आले. त्यानंतर तणाव अधिकच वाढल्याने त्यांना सोडून देण्यात आले.
आंदोलनकर्त्यांनी दुपारी शहरातील दुकाने तोडफोड करीत बळजबरीने बंद करायला सुरुवात केल्यानंतर तणाव वाढल्याचा आरोप आहे. आंदोलकांनी मात्र हा आरोप फेटाळला असून आपल्या बदनामीसाठी हा प्रकार केला गेल्याचा दावा केला आहे. गुजरात सरकारने आरक्षणाची मागणी नाकारली असून आरक्षणाचे प्रमाण ५० टक्क्य़ांपुढे न्यायला सर्वोच्च न्यायालयानेच मनाई केली आहे, याकडे लक्ष वेधले आहे. आपल्या समाजातील मुलांना महाविद्यालयात प्रवेश मिळविणे कठीण होते आणि सुशिक्षित तरुणांना नोकरी मिळण्यात अडचणी येतात. त्यामुळे महाविद्यालये आणि सरकारी सेवांमध्ये पटेल वा पाटीदार समाजाला आरक्षण हवे, अशी हार्दिक यांची मागणी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा