बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखालील महाआघाडीला टक्कर देताना भाजपची दमछाक होऊ लागल्याचे दिसू लागले आहे. त्यातच आता भावनिक मुद्द्यांचा आधार घेऊन भाजपने प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी रक्सौलमधील एका प्रचारसभेत जर बिहारमध्ये चुकून भाजपचा पराभव झाला, तर पाकिस्तानमध्ये फटाके वाजतील, असे वक्तव्य केले.
नेपाळच्या सीमेलगत असलेल्या रक्सौल, सिवान, पूर्व चंपारण, पश्चिम चंपारणमध्ये अमित शहा यांनी प्रचारसभा घेतल्या. रक्सौलमधील सभेमध्ये त्यांनी जर बिहारमधील विधानसभा निवडणुकीत भाजपचा चुकून पराभव झाला तर पाकिस्तानमध्ये फटाके वाजतील. पराभव तर बिहारमध्ये होईल पण त्याचा परिणाम पाकिस्तानमध्ये दिसेल, असे म्हटले आहे.
दहशतवाद्यांविरोधात नितीशकुमार यांच्या सरकारने कोणतीच कारवाई न केल्याचा आरोपही भाजपने केला आहे. यासाठी बिहारमधील सर्व वृत्तपत्रात पहिल्या पानावर जाहिरात देण्यात आली आहे. इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या यासिन भटकळ बिहारमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर असताना राज्य सरकारने काहीच कारवाई केली नाही, असाही आरोप भाजपने केला आहे.

Story img Loader