भारत आणि पाकिस्तानला अमेरिकेचे आश्वासन
दोन्ही देशांनी जर आम्हाला विचारणा केली तरच काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी काही मार्ग सुचवू अन्यथा तसे करण्याचे आम्हाला काही कारण नाही असे अमेरिकेने म्हटले असून, भारत व पाकिस्तान यांच्यातील संवाद प्रक्रियेचा वेग, व्याप्ती व स्वरूप हे त्यांनीच ठरवायचे आहे असे मत व्यक्त केले आहे.
एका वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितले, की जर दोन्ही देशांनी विचारणा केली तर आम्ही काश्मीर प्रश्नात भूमिका पार पाडू, पण अन्यथा या प्रश्नात मध्यस्थी करण्याची आमची इच्छा नाही. भारत-पाकिस्तान या दोन देशांनीच तो प्रश्न सोडवायचा आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी अमेरिकेने मध्यस्थी करावी अशी मागणी केली होती. त्यावर अधिकाऱ्याने सांगितले, की भारत-पाकिस्तान या दोन देशांतील संवादाचे स्वरूप, व्याप्ती व वेग त्यांनीच ठरवायचे आहे. दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यासाठी पाठिंबा देण्याची भूमिका पार पाडण्याची अमेरिकेची तयारी आहे. दोन्ही देशांनीच काश्मीर प्रश्न सोडवायचा आहे ते काम आम्ही त्यांच्यावरच सोपवीत आहोत. दोन्ही देशांतील संबंध सुधारावेत अशीच आमची इच्छा आहे.
काश्मीरप्रश्नी अमेरिकेने मध्यस्थी करावी अशी मागणी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केली होती, तरी ती विनंती अमेरिकी सरकार व ओबामा यांनी लगेच फेटाळली होती व दोन्ही देशांतील प्रश्न त्यांनीच संवादाच्या मार्गाने सोडवण्यास सांगितले होते.
माहीतगार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबरमध्ये व्हाइट हाऊस येथे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या ओबामा भेटीवेळी हा प्रश्न कधीच चर्चेस आला नव्हता. उलट अमेरिकेने पाकिस्तानला काश्मीरसह सर्व प्रश्न सोडवण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करण्याचा सल्ला दिला होता. पाकिस्तान पुरस्कृत भारतविरोधी दहशतवादी कारवायांचा मुद्दा अमेरिकेने पाकिस्तानकडे तातडीने उपस्थित केला होता याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.