आपण जनतेचे सेवक आहोत, हे समजून सर्व सरकारी अधिकारी वागू लागले, तर टू जी स्पेक्ट्रम आणि कोळसा खाण वाटप यांसारखी भ्रष्टाचाराची प्रकरणे घडलीच नसती, असे मत भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी अशोक खेमका यांनी गुरुवारी व्यक्त केले. यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांनी हरियाणा सरकारने दिलेल्या जमीन व्यवहारातील गरप्रकार खेमका यांनी उघड केले आहेत.
खेमका यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या आयडिया एक्स्चेंजमध्ये आपली मते मोकळेपणाने मांडली. ते म्हणाले, सरकारी अधिकारी आपण जनतेचे सेवक आहोत, या भावनेने वागले असते, तर टूजी, कोळसा खाण यासारखे घोटाळे नक्कीच घडले नसते. प्रत्येक १०० सरकारी अधिकाऱ्यांमागे दहा जण आपली कर्तव्ये विसरणाऱ्यांच्या रांगेत उभे असतात. त्यांच्यातूनच मग काही व्यक्ती निवडल्या जातात.
कंपनी कायद्यामध्ये एक नवीन नियम समाविष्ट करणे आवश्यक आहे. जेव्हा कोणीही व्यक्ती एखाद्या कंपनीमध्ये संचालकपदावर जाते त्या वेळी तुम्ही तुमच्या हितसंबंधांबद्दल स्पष्टपणे माहिती दिली
पाहिजे.
जर तुम्ही दिलेली माहिती चुकीची असेल, तर कंपनीला तुमच्यावर कारवाई करण्याचा अधिकार असला पाहिजे. सार्वजनिक क्षेत्रामध्ये अशा स्वरूपाचा कोणताही कायदा नाही, याकडे खेमका यांनी लक्ष वेधले.
आपल्याला राजकारण्यांबद्दल नितांत आदर असल्याचे सांगून ते म्हणाले, आतासुद्धा बुद्धिमान, सर्वसमावेशक विचार करणाऱ्या २० राजकारण्यांची नावे मी तुम्हाला सांगू शकतो. हे राजकारणी सरकारी अधिकाऱ्यांपेक्षाही हुशार असून, प्रामाणिकपणे आपले काम करताहेत असे त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader