उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन आपल्या विचित्र निर्णयांमुळे कायम चर्चेत असतो. दरम्यान, त्याने उत्तर कोरियात आता एक नवीन कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार उत्तर कोरियात मुलांच्या हॉलिवूड चित्रपट बघण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या चित्रपटामुळे मुलांवर वाईट संस्कार होतात, असा दावा किम जोंग उनने केला आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, हुकुमशाह किम जोंग उनने उत्तर कोरियात एक नवा कायदा लागू केला असून या कायद्यानुसार मुलांच्या हॉलिवूड चित्रपट बघण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जर एखादा मुलगा हॉलिवूड चित्रपट बघताना आढळला तर त्याच्या पालकाला सहा महिने लेबर कॅम्पमध्ये पाठवण्यात येणार आहे. तसेच मुलाला पाच वर्षाच्या तुरुंगवास भोगावा लागणार आहे. हॉलिवूड चित्रपटामुळे मुलं समाजविरोधी बनत असून त्यांच्यावर वाईट संस्कार होतात, असा दावा किम जोंग उनने केला आहे.
हेही वाचा – उत्तर कोरियाच्या हुकूमशहाने वाढवली जगाची चिंता; किम जोंग उनच्या उपस्थितीत क्षेपणास्त्रांची चाचणी
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उत्तर कोरियामध्ये दोन शाळकरी विद्यार्थ्यांना दक्षिण कोरियन तसेच अमेरिकी चित्रपट पाहिल्याच्या गुन्ह्याखाली मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली होती. के-ड्रामा नावाने ओळखले जाणारे कोरियन चित्रपट पाहणे आणि त्यांचा प्रसार करणे हा उत्तर कोरियामध्ये गंभीर गुन्हा आहे. याच गुन्ह्याअंतर्गत ही शिक्षा करण्यात आली होती.