स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते मुंबईतील आयईएस राजा शाळेत ध्वज फडकवण्यात आला. यावेळी त्यांनी भारताच्या आर्थिक स्वातंत्र्याबाबत मत मांडलं. तसेच चीनवर अवलंबून असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. “आपण इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचा वापर करतो. मात्र मुळात हे भारतातलं नाही. आपण कितीही चीनबद्दल ओरडत राहू, मात्र आपल्या फोनमधील ज्या वस्तू आहेत त्या चीनमधून येतात. जिथपर्यंत आपण चीनवर अवलंबून राहू, तोपर्यंत चीनसमोर झुकावं लागेल”, असं स्पष्ट मत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडलं.
“कोणत्याही परकीय आक्रमकाचे पाय आपल्या भूमीवर पडले की संघर्ष सुरु व्हायचा. आक्रमकांनी आपल्या देशावर अनेक वेळा हल्ला केला. आपण १५ ऑगस्टला त्याला पूर्णविराम दिला आहे. लढाई लढणारे महान पुरुष आपल्याला प्रेरणा देतात. त्यांची आठवण करण्याची ही वेळ आहे. १५ ऑगस्ट १९४७ ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर आपण आपलं जीवन जगण्यास मोकळे झालो”, असंही मतंही सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडलं.
#WATCH | We use internet&technology. We don’t have its actual technology&get it from outside. We might speak on China&call for boycott but where does everything on your mobile come from? If dependency on China increases, we’ll have to bow before them: RSS Chief Mohan Bhagwat(1/2) pic.twitter.com/QpihPYKcCd
— ANI (@ANI) August 15, 2021
दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित केलं. २१ व्या शतकात भारताला स्वप्न पूर्ण करण्यास रोखू शकत नाही असं त्यांनी यावेळी सांगितलं. चीन आणि पाकिस्तानचं नाव न घेता त्यांनी हे मत मांडलं. करोना काळात भारतात होत असलेल्या विक्रमी लसीकरण मोहिमेविषयी देखील पंतप्रधानांनी यावेळी उल्लेख केला. “मानवतेसमोर करोनाचा हा काळ खूप मोठ्या आव्हानाचा आहे. भारतीयांमध्ये खूप संयम आणि धैर्य आहे. या लढ्यामध्ये आपल्यासमोर अनेक आव्हानं होती. पण प्रत्येक क्षेत्रात आपण देशवासीयांनी असामान्य वेगाने काम केलं. आपल्या वैज्ञानिकांच्या ताकदीचा परिणाम आहे, की भारताला लसीसाठी इतर कोणत्या देशावर अवलंबून राहावं लागलं नाही. तुम्ही कल्पना करा की जर भारताकडे स्वत:ची लस नसती, तर काय झालं असतं? पोलिओची लस मिळवण्यात आपले किती वर्ष निघून गेले. एवढ्या संकटात जगात महामारी असताना आपल्याला लस कधी मिळाली असती? पण आज गर्वाने सांगता येतंय की जगातली सगळ्यात मोठी लसीकरण मोहीम आपल्या देशात सुरू आहे. ५४ कोटींपेक्षा जास्त लोकांना लस देण्यात आली आहे. कोविनसारखी ऑनलाईन व्यवस्था आज जगाला आकर्षित करत आहे. या संकटात भारत ज्या पद्धतीने ८० कोटी देशवासीयांना महिन्याचं धान्य दिलं, हा देखील जगभरात चर्चेचा विषय आहे”, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले.