सर्वस्वी इंटरनेटवर अवलंबून असलेली आजची गुगल पिढी मेंदूने मृतवत होण्याची भीती इंग्लंडमधील प्रख्यात संशोधक ट्रेव्हर बायलिस यांनी व्यक्त केली आहे. विंड-अप रेडिओचा शोध लावणाऱ्या बायलिस यांनी सांगितले, की इंटरनेटमुळे मुलांमधील सर्जनशीलता संपत आहे व प्रायोगिक कौशल्येही लोप पावत आहे, कारण ते बराच काळ संगणकाच्या पडद्यासमोरच बसून असतात.इंटरनेटमुळे स्वतंत्रपणे विचार करण्याची सवय न उरल्याने संशोधकांची पुढची पिढी बरबाद होऊन जाईल. कारण तरुणांना स्वत:च्या हाताने एखादी गोष्ट करण्याची सवयच उरलेली नाही असे डेली मेलने बायलिस यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. जर शाळांनी मेकॅनोसारखी प्रात्यक्षिकावर आधारित खेळणी पुन्हा वापरायला सुरुवात केली तर मुलांची ही कौशल्ये पुन्हा पुनरुज्जीवित होऊ शकतील असे सांगून ते म्हणतात, की मुलांना मोबाईल फोन किंवा संगणकावर अवलंबून ठेवता कामा नये. जर आवश्यकता असेल तेव्हाच संगणकाचा वापर करणे गरजेचे आहे. अनेक लोक संगणकावर गेम खेळत असतात व बराच काळ ते एका ठिकाणी बसून घालवतात. ते गुगल सर्चच्या अधीन झालेले आहेत. इंटरनेटवरचे अवलंबित्व कमी केले नाही तर ते एखादी गोष्ट पूर्वीप्रमाणे करू शकणार नाहीत. थोडक्यात त्यांचे मेंदू मृतवत होतील.    

Story img Loader