Giriraj Sing On Nathuram Godse : केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम भारताचा सुपुत्र होता असं वक्तव्य केलं आहे. ANI ने केंद्रीय मंत्र्यांचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. गिरीराज सिंह यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले गिरीराज सिंह?
“नथुराम गोडसेने महात्मा गांधींची हत्या केली असली तरीही तो भारताचा सुपुत्र होता. कारण नथुराम गोडसेचा जन्म भारतात झाला. ते भारतात जन्माला आले. औरंगजेब किंवा बाबर यांच्या प्रमाणे घुसखोर नव्हता. ज्याला बाबरची अवलाद आहोत हे म्हणण्यात धन्यता वाटते तो भारतमातेचा सुपुत्र असू शकत नाही.” असं गिरीराज सिंह यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह हे सध्या छत्तीसगढच्या दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी नथुराम गोडसेचा उल्लेख भारताचा सुपुत्र होता असा केला आहे. औरंगजेब आणि बाबर हे दोघेही घुसखोर होते. मात्र महात्मा गांधी यांची हत्या केली असली तरीही नथुराम गोडसे हे भारताचे सुपुत्र होते असं गिरीराज सिंह यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गिरीराज सिंह यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधत असताना हे वक्तव्य केलं आहे.
आपल्या छत्तीसगढ दौऱ्यादरम्यान गिरीराज सिंह म्हणाले की, “छत्तीसगढमध्ये जर भाजपाचं सरकार आलं तर आम्ही धर्मांतरण विरोधी कठोर कायदा आणू. जर कायद्याच्या कक्षेत कुणाला धर्मांतर करायचं असेल तर तो व्यक्ती धर्मांतर करु शकतो. मात्र जबरदस्तीने, प्रलोभन दाखवून धर्मांतर केलं गेलं तर त्याविरोधात कारवाई होईल. छत्तीसगढमध्ये काँग्रेस सरकार दहशतवादाला खतपाणी घालतं आहे. तसंच लोकांना धर्मांतरासाठी भरीस पाडलं जातं आहे.” असाही आरोप गिरीराज सिंह यांनी केला.