Surat Diamond Bourse Inaugurated By PM Modi : जगातील सर्वांत मोठं कार्यलय असलेल्या सूरत डायमंड बोर्सचे आज (१७ डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. गेल्या काही वर्षांत सूरत हे नवे व्यापारी पेठ म्हणून उदयाला येत आहे. त्यामुळे येथे आता सराफा बाजार केंद्र निर्माण करण्याच्या उद्देशाने सूरत डायमंड बोर्स तयार करण्यात आलं आहे. यामुळे देशाला जागतिक स्तरावर हिरे व्यापार करण्यास संधी मिळेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. सूरत डायमंड बोर्सचे उद्घाटन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जमलेल्या जनतेशी संवाद साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“जागतिक अर्थव्यवस्थेत भारत नक्कीच तिसऱ्या क्रमांकावर जाणार आहे. सरकारने येणाऱ्या २५ वर्षांचंही लक्ष्य ठरवलं आहे. ५ ट्रिलिअन डॉलर आणि १० ट्र्लिअन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी काम केलं जात आहे. आम्ही देशाच्या एक्स्पोर्टलाही रेकॉर्ड उंचीवर घेऊन जाण्यासाठी काम करत आहोत. यात सूरतच्या डायमंड इंडस्ट्रीची जबाबदारी वाढली आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

सूरतने टार्गेट ठरवावं

“सूरत शहरालाही टार्गेट ठरवलं पाहिजे. देशाच्या प्रगतीत सूरतची भागिदारी कशी वाढेल, हे सूरतने आता ठरवलं पाहिजे. डायमंड सेक्टर जेम्स आणि ज्वेलर्ससाठी आव्हानही आहे आणि संधीही आहे. डायमंड ज्वेलरी एक्स्पोर्टमध्ये भारत पुढे आहे. सिल्वर कट डायमंडमध्येही आपण अग्रणी आहोत. जगातील एकूण एक्स्पोर्टमध्ये भारताची टक्केवारी फक्त साडेतीन टक्के आहे. सूरतने ठरवलं तर जेम्स आणि ज्वेलरी एक्स्पोर्टमध्ये आपण डबल डिजिटमध्ये येऊ शकतो”, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“मी गॅरंटी देतो की तुमच्या प्रत्येक प्रयत्नात सरकार तुमच्यासोबत आहे. आम्ही सुरुवातीपासूनच या सेक्टरला एक्स्पोर्ट प्रमोशनसाठी फोकस एरिआ ठरवलं आहे. अनेक प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. आपल्या या प्रयत्नांचा जास्तीत जास्त फायदा उठवायचा आहे. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा बोलबाला आहे. जगभर भारताची चर्चा आहे”, असं मोदी म्हणाले.

सूरतमुळे गुजरातची प्रगती होईल

“तुम्हा सर्वांचं सामर्थ्य वाढवण्यासाठी सरकार सूरतचंही सामर्थ्य वाढवत आहे. आमचं सरकार सूरतमध्ये आधुनिक पायाभूत सुविधांसाठी विशेष प्रयत्न करत आहे. आज सूरतमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ आहे. सूरतमध्ये मेट्रो रेल्वे सेवा आहे. सूरत पोर्टमध्ये अनेक महत्त्वाच्या उत्पादनांची एक्स्पोर्टसाठी बंदर आहे, सूरत सातत्याने आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्राशी जोडलं जातंय. अशी आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी जगातील फार कमी शहरात असं आहे. सूरतला बुलेट ट्रेन प्रकल्पाशीही जोडलं आहे. वेस्टर्न डेडिकेट फ्रेट कॉरिडॉरवरही काम सुरू आहे. यामुळे, उत्तर-पूर्व भारतपर्यंत सूरतची रेल कनेक्टिव्हीट सशक्त होईल. अशी आधुनिक कनेक्टिव्हिटी असणारा सूरत देशाचं एकमेव शहर आहे. याचा जास्तीत जास्त लाभ उठवा. सूरतची प्रगती झाली तर गुजरातची प्रगती होईल आणि गुजरातची प्रगती झाली तर माझ्या देशाची प्रगती होईल”, असंही मोदी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If gujarat progresses the country will progress pms statement at the inauguration of surat diamond bourse said sgk