लोकसभेतील गोंधळामुळे अर्थमंत्री पी. चिदंबरम हंगामी अर्थसंकल्प मांडू न शकल्यास केंद्र सरकारने देशवासियांना अर्थसंकल्पातील तरतुदी प्रत्यक्ष ऐकता याव्यात, यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. लोकसभेत अर्थमंत्र्यांच्या भाषणावेळी गोंधळाची स्थिती असेल, तर लोकसभा टीव्हीच्या स्टुडिओमध्ये चिदंबरम आपले भाषण वाचून दाखवतील आणि त्याचे प्रसारण देशभरात केले जाईल.
वेगळ्या तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी गेल्या आठवड्यात संसदेत मांडण्यात आलेल्या विधेयकावेळी निर्माण झालेल्या गोंधळामुळे सरकराने पर्यायी व्यवस्था करून ठेवली आहे. चिदंबरम केवळ औपचारिकपणे हंगामी अर्थसंकल्प लोकसभेच्या पटलावर ठेवतील आणि लोकसभा स्टुडिओमध्ये त्याचे वाचन करतील. अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
चिदम्बरम सोमवारी संसदेत २०१४-१५ या आर्थिक वर्षांसाठीचा हंगामी अर्थसंकल्प सादर करतील. कोणतीही मोठी घोषणा किंवा कोणतीही करवाढ न सुचवता गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारने केलेल्या कामगिरीचा आढावाच या अर्थसंकल्पात घेतली जाण्याची दाट शक्यता आहे.
लोकसभा निवडणुका जवळ आल्याने केंद्र सरकारला अर्थसंकल्प सादर करता येणार नाही. परिणामी प्रथेप्रमाणे अर्थमंत्री संसदेत लेखानुदान मांडतील. जूनमध्ये नवीन सरकार सत्तारूढ झाल्यानंतरच अर्थसंकल्प सादर केला जाईल. त्यामुळे हंगामी अर्थसंकल्पात चिदम्बरम सामान्यांना दिलासा देणारा किंवा विविध करांमध्ये सूट अशा कोणत्याही घोषणा करणार नाहीत अशीच अटकळ आहे. त्यांनी तसे संकेतही अलीकडेच दिले होते. मात्र, असे असले तरी गेल्या अर्थसंकल्पात सादर करण्यात आलेला अतिश्रीमंतांवरील कर (सुपर-रिच टॅक्स) यंदाही कायम राहतो का याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. एक कोटी किंवा त्याहून अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्यांसाठी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात १० टक्के सुपर-रिच टॅक्स लावण्यात आला होता. कोणतीही करवाढ किंवा करसुधारणा न करता विविध क्षेत्रांसाठी अबकारी करात वा सेवाकरात कपात केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, तरीही अखेरचा अर्थसंकल्प सादर करताना चिदम्बरम चालू वित्तीय तूट थोपवण्यासाठी ठोस काहीतरी उपाययोजना करतील अशीच अटकळ जास्त आहे.