मनी लाँड्रिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर सध्या तिहार तुरुंगात आहे. त्यात आम आदमी पक्षाच्या नेत्याने १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सुकेश चंद्रशेखरने केला होता. त्यानंतर आता सुकेश चंद्रशेखरने थेट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला केला आहे.
सुकेश चंद्रशेखरने काही दिवसांपूर्वी दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांना पत्र लिहलं होतं. त्यामध्ये आपचे नेते सत्येंद्र जैन यांनी १० कोटी रुपये तुरुंगात सुरक्षित राहण्यासाठी मागितल्याचा आरोप केला आहे. तसेच, आपला ५० कोटी रुपयांची देणगी दिल्याचंही सुकेशने सांगितलं. यावरून पलटवार करताना अरविंद केजरीवाल यांनी सुकेशला ‘ठग’ संबोधलं होतं.
हेही वाचा : “काही पर्यायच उरला नव्हता”, ट्विटरमधील ५० टक्के कर्मचारी कपातीवर एलॉन मस्क यांचं स्पष्टीकरण!
आता सुकेश चंद्रशेखरने अरविंद केजरीवाल यांना ‘महाठग’ म्हटलं आहे. सुकेशचे आणखी एक पत्र समोर आलं आहे. “केजरीवाल यांच्या मते मी देशाचा सर्वात मोठा ‘ठग’ आहे. मग माझ्याकडून ५० कोटी रुपये घेऊन मला राज्यसभेची ऑफर का दिली? मग तुम्ही तर ‘महाठग’ होता. तसेच, उमेदवारी देतो म्हणून २० ते ३० लोकांना ५०० कोटी रुपयांचा पक्षनिधी देण्यासाठी भाग पाडले,” असा गंभीर आरोप सुकेशने केजरीवाल यांच्यावर केला आहे. ‘इंडिया टुडे’ने याबाबत वृत्त दिलं आहे.
“दक्षिण भारतात मोठे पद आणि राज्यसभेची…”
दरम्यान, सुकेशने आपचे नेते सत्येंद्र जैन यांच्यावर आरोप करताना म्हटलं होत की, “२०१५ सालापासून सत्येंद्र जैन यांना मी ओळखत आहे. त्यांनी दक्षिण भारतात मोठे पद आणि राज्यसभेची उमेदवारी देण्याचे आश्वासन दिलं होते. यासाठी आपला ५० कोटी रुपयांची देणगीही दिली होती.”
हेही वाचा : व्लादिमीर पुतिन यांच्याकडून भारताचे पुन्हा कौतुक, म्हणाले “भारतातील लोक…”
“दोन ते तीन महिन्यांत १० कोटी रुपये…”
“तत्कालीन तुरुंग मंत्री सत्येंद्र जैन यांनी माझी अनेकदा भेट घेतली. २०१९ सालीही सत्येंद्र जैन यांनी माझी भेट घेतली. त्यांचे सचिव सुशील यांनी तुरुंगात सुरक्षितपणे राहण्यासाठी दरमहा २ कोटी रुपयांची मागणी केली. त्यानंतर माझ्यावर दबाव टाकून दोन ते तीन महिन्यांत १० कोटी रुपये वसुल करण्यात आलं. हे सर्व पैसे जैन यांचा कोलकात्यातील निकटवर्तीय चतुर्वेदी याच्याकडे दिले,” असेही चंद्रशेखर म्हणाला.