Pakistan Defence Minister Khawaja Asif Statement: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची राजनैतिक कोंडी करत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे खवळलेल्या पाकिस्तानकडून आता भारताविरोधात गरळ ओकण्यास सुरुवात झाली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचे कबूल केले. संयुक्त राष्ट्राच्या परिषदेत भारताने दहशतवादावरून अनेकदा पाकिस्तानचा बुरखा फाडलेला आहे. मात्र पाकिस्तानने त्यांच्या भूमीत दहशतवादी नसल्याचे सांगितले होते. मात्र आता ख्वाजा आसिफ यांनी तीन दशकांपासून दहशतवादी पोसल्याचे म्हटले आहे.
स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये ख्वाजा आसिफ यांचे हे विधान समोर आले आहे. पत्रकार यालदा हकीम यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये नव्याने निर्माण झालेल्या संघर्षाबाबत प्रश्न विचारला होता. अनेक वर्षांपासून दहशतवादांना पाठिंबा, प्रशिक्षण आणि पैसा पुरवत असल्याचा आरोप पाकिस्तानवर होत आहे, याबाबत तुमचे काय म्हणणे आहे, असा प्रश्न हकीम यांनी विचारला.
यावर ख्वाजा आसिफ म्हणाले की, हो, आम्ही हे घाणेरडे काम अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांसाठी मागच्या तीन दशकांपासून केले.
“पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग त्यांनी नाकारला आहे. आम्ही दहशतवादाला पाठिंबा देत नाहीत. कोणत्याही परिस्थितीत निष्पाप नागरिकांचा बळी जायला नको, हीच आमची भूमिका आहे. निशस्त्र लोकांना लक्ष्य करणे, हे आमच्या राष्ट्रीय धोरणाच्या विरोधात आहे. पण जर भारताचे लष्कर किंवा पोलिसांच्या छळाच्या विरोधात तेथील लोक त्यांच्या मूलभूत अधिकारांसाठी हातात शस्त्र घेत असतील तर अशावेळी त्यांचा दोष पाकिस्तानवर ढकलणे सोपे असते”, असेही संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले.
स्काय न्यूजशी बोलताना ख्वाजा आसिफ म्हणाले की, पाकिस्तान अनेक दशकापासून दहशतवादाचा बळी ठरलेला आहे. ८० च्या दशकात अफगाणिस्तानशी झालेले युद्ध आणि त्यानंतरच्या दहशतवादी कृत्यामुळे पाकिस्तानएवढे जगातील कोणत्याही देशाने भोगले नसेल. दहशतवादाचे दुःख काय असते, हे पाकिस्तानला चांगले माहीत आहे.
बुधवारी पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा हात आहे असल्याचे ठोस पुरावे सादर करा, असे आव्हान भाराताला दिले होते. बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, भारत पुन्हा एकदा दोषारोप करण्याचा प्रकार करत आहे. जर पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असेल तर पाकिस्तान आणि जगासमोर तसे पुरावे सादर केले गेले पाहिजेत.