‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरून सध्या देशातलं राजकारण ढवळून निघालं आहे. पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्यासह अनेक भाजपा नेत्यांनी या चित्रपटाला पाठिंबा दर्शवला आहे. विरोधकांनी मात्र यावर टीका केली आहे. ‘द कश्मीर फाईल्स’ जर बनू शकते तसंच ‘लखीमपूर फाईल्स’ असा चित्रपटही बनायला हवा अशी मागणी करत समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपावर टीका केली आहे.
जर ‘कश्मीर फाईल्स’ असा चित्रपट बनू शकतो तर जिथं जीपच्या चाकांखाली शेतकऱ्यांना चिरडण्यात आलं तिथला लखीमपूर फाईल्स असाही चित्रपट बनायला हवा, असं अखिलेश यादव म्हणाले आहेत. अखिलेश काल सीतापूर जिल्ह्यात पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांना द कश्मीर फाईल्स या चित्रपटाविषयीचं त्यांचं मत विचारण्यात आलं होतं.
विवेक अग्निहोत्री यांचं दिग्दर्शन असलेला ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट १९९० च्या काळातल्या काश्मिरी पंडितांच्या समस्यांवर भाष्य करणारा आहे. हा चित्रपट टॅक्स फ्री करणाऱ्या राज्यांपैकी उत्तर प्रदेश हे एक राज्य आहे. या व्यतिरिक्त मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, हरयाणा, गोवा, त्रिपुरा आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. ही सर्व राज्ये भाजपाशासित आहेत.