मद्य धोरणावरून दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांवर आरोप करत त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर दिल्लीतलं राजकारण तापलं आहे. अशात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. केजरीवाल म्हणाले या सगळ्याबाबत माझं अनेक लोकांशी बोलणं झालं आहे. लोकांमध्ये मोठ्या प्रमामावर रोष आहे. जनतेचं म्हणणं आहे की भाजपाकडून हे काय केलं जातं आहे?
काय म्हटलं आहे केजरीवाल यांनी?
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत अरविंद केजरीवाल म्हणाले की त्यांनी आमच्या दोन खूप चांगल्या मंत्र्यांना तुरुंगात डांबलं आहे. सत्येंद्र जैन हे आमचे आरोग्य मंत्री होते आणि मनिष सिसोदिया हे शिक्षण मंत्री होते. त्यांना मोदी सरकारने अटक केली आहे. या दोघांचा संपूर्ण देशाला अभिमान वाटतो कारण त्यांनी संपूर्ण जगात आपलं काम पोहचवलं आहे. सत्येंद्र जैन यांनी मोहल्ला क्लिनिक मॉडेल दिलं. एवढंच नाही तर केजरीवाल यांनी हेदेखील म्हटलं आहे मनिष सिसोदिया हे भाजपात गेले तर त्यांच्याविरोधातली सगळी प्रकरणं मागे पडतील, त्यांना क्लिन चीटही मिळेल.
आम आदमी पक्षाचे नेते मनिष सिसोदिया यांनी शिक्षण क्षेत्रात खूप चांगलं काम केलं आहे. त्यांनी चांगलं काम केलं नसतं तर त्यांना अटक झाली नसती. सिसोदिया यांना अटक करण्याचा अर्थ इतकाच आहे की त्यांना रोखता यावं. आज अशी स्थिती आहे की मनिष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनी जर भाजपात प्रवेश केला तर सगळी प्रकरणं निकाली लागतील. सीबीआय आणि ईडीच्या माध्यमातून विरोधी पक्षाला त्रास दिला जातो आहे असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे शिक्षण क्षेत्रात आणि आरोग्य क्षेत्रात दिल्ली सरकारने सांगितलं आहे. दिल्लीत चांगलं काम सुरू होतं, यापुढेही ते असंच सुरू राहिल. किती कारवाई झाली तरी आम्ही विकास कामं करणं बंद करणार नाही असंही केजरीवाल यांनी सांगितलं.