राज ठाकरे महायुतीत येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याचं कारण राज ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे आणि त्यांचा मुलगा अमित ठाकरे यांची आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची चर्चा झाली. या भेटीमध्ये मनसेला बरोबर घेण्याची चर्चा झाल्याचं समजतं आहे. मात्र बैठकीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. अतुल भातखळकर यांनी या सगळ्याबाबत भाष्य केलं आहे.
अतुल भातखळकर यांनी काय म्हटलं आहे?
“राष्ट्रीय लोकशाही आघाडी, भाजपाच्या नेतृत्वात कार्यरत आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे की पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींना बसवण्याला जे समर्थन देतात त्यांचं आम्ही महाराष्ट्रात, महायुतीत स्वागत करु. राज ठाकरेंनी तसा विचार केला असेल तर त्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेने ठरवलं आहे की ४५ पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात आणि देशात ४०० पार हे भाजपा आणि रालोआला मिळणार आहेत. राज ठाकरे महायुतीत आले तर त्याचा फायदा आगामी राजकारणात नक्की होईल.”
संजय राऊत यांच्यावर टीका
“संजय राऊत यांना म्हणावं आधी महाभकास आघाडीच्या जागावाटपाचं बघा, वंचित बरोबर काही जमतंय का बघा. त्यानंतर आमच्याविषयी बोला. संजय राऊत डोक्यावर पडलेले गृहस्थ आहेत. त्यांच्या विधानांना आम्ही गांभीर्याने घेत नाही. ४५ पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रातून निवडून आणू, महायुती तितक्या जागा जिंकेल” असा विश्वास अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- राज ठाकरे महायुतीत येणार का? छगन भुजबळ म्हणाले, “चांगली गोष्ट ही आहे की..”
सध्या आमचे काही उमेदवार घोषित झाले आहेत, आमचे आणि मित्रपक्षांचे काही उमेदवार घोषित होणार आहेत. मुंबईत सहाच्या सहा जागा कशा निवडून येतील यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातलाच एक भाग म्हणून भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक होते आहे. राज ठाकरे बरोबर आल्याने आम्हाला मुंबईतच नाही तर महाराष्ट्रात येतील. महायुतीच्या ४५ जागा नक्की निवडून येणार आहेत. राज ठाकरे आमच्या बरोबर आले तर आम्हाला नक्कीच आनंद होईल असंही अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.