सध्याच्या सरकारकडून जर राम मंदिर उभारण्यात येणार नसेल तर पुढे सरकार बनणार नाही. मात्र, राम मंदिर जरुर बनेल, असा स्पष्ट इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिला आहे. अयोध्येत राम जन्मभूमीवर जाऊन रामलल्लाचे सहपरिवार दर्शन घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उद्धव म्हणाले, अयोध्येत येण्यात माझा कोणताही छुपा अजेंडा नाही. देशातील हिंदुंची भावना व्यक्त करण्यासाठी मी इथं आलो आहे. मात्र, आता सरकारने हिंदुंच्या भावनांशी खेळू नये. इतके दिवस, वर्षे, पिढी गेली तरी राम मंदिर उभे राहत नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी म्हटल्याप्रमाणे मंदिर इथं होतं, आहे आणि राहिलं याच्याशी आम्ही सहमत आहोत. मात्र, हे मंदिर दिसत का नाही? असा खडा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

राम मंदिरासाठी अध्यादेश आणा, कायदा करा किंवा काहीही करा, मात्र मंदिर लवकरात लवकर बनवा. शिवसेनेची हिंदुत्वासाठी तुम्हाला साथ आहेच. संविधानाच्या चौकटीत जी प्रत्येक गोष्ट शक्य असेल त्याचा शोध घेतला जाईल, असे आश्वासन २०१४च्या निवडणुकीपूर्वी भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात दिले होते. मग गेल्या चार वर्षात तुम्ही काय केलं? असा सवालही उद्धव ठाकरे भाजपाला विचारलं. तसेच जर हे होत नसेल तर जनतेसमोर जाहीर माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

रामलल्लाच्या दर्शनाला गेल्यानंतर तिथं चैतन्याचे वातावरण भासले मात्र मी रामलल्लाच्या दर्शनासाठी मंदिरात चाललो की जेलमध्ये चाललो हे कळत नव्हतं, अशी खंतही यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. निवडणुकी आधी राम राम नंतर आराम सुरु असल्याची कडवी टीकाही त्यांनी यावेळी भाजपावर केली.

रामलल्लाच्या दर्शनाला गेल्यानंतर तिथं चैतन्याचे वातावरण भासले मात्र मी रामलल्लाच्या दर्शनासाठी मंदिरात चाललो की जेलमध्ये चाललो हे कळत नव्हतं, अशी खंतही यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. निवडणुकी आधी राम राम नंतर आराम सुरु असल्याची कडवी टीकाही त्यांनी यावेळी भाजपावर केली. तसेच ट्रिपल तलाक, नोटाबंदीसाठी तुम्ही कोर्टात गेले होते का? मग राम मंदिरासाठीही अध्यादेश आणा, अशी पुन्हा एकदा आग्रही मागणी उद्धव यांनी केली आहे.