प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांच्याविरुद्ध केल्या गेलेल्या वादग्रस्त ट्विटवरून अभिनेते आणि भाजप खासदार परेश रावल गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. आता परेश रावल यांनी पुन्हा अरुंधती यांच्याविरोधात एक विधान केले आहे. अरूंधती रॉय यांच्याद्दल केलेल्या ट्विटबाबत आपल्याला कोणताही पश्चाताप नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. जे सैन्य कधीच उलट उत्तर देत नाहीत त्यांच्याबद्दल बोलण्याऐवजी तुमच्यात हिंमत असेल तर ममता बॅनर्जीविरोधात बोलून दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले आहे. ‘दगडफेक करणाऱ्या व्यक्तीऐवजी अरुंधती रॉय यांना लष्काराच्या जीपला बांधायला हवे होते,’ असे ट्विट परेश रावल यांनी केले होते. अनेकांना हे ट्विट आक्षेपार्ह वाटले त्यामुळे परेश यांना ट्विटरकरांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अरुंधती यांनी काश्मीरमध्ये होत असलेल्या भारतीय सेनेच्या कारवाईची निंदा केली होती, असे वृत्त पाकिस्तानी मीडियाने प्रसिद्ध केले होते. त्यावर ६७ वर्षीय रावल यांनी हे ट्विट केले होते. पण नंतर हे वृत्त खोटे असल्याचे स्पष्ट झाले. पण तरीही आपण केलेल्या वक्तव्याबद्दल कोणताही खेद नसल्याचे म्हणत परेश म्हणाले की, ‘जरी रॉय यांना त्या जीपला बांधले असते तरी कोणाचीही दगडफेक करण्याची हिंमत झाली नसती. कारण रॉय यांनी नेहमीच त्यांच्या विचारांचे समर्थन केले आहे.’

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत परेश रावल म्हणाले की, ‘तुम्ही अशा लष्कराबद्दल बोलता जे कधीच तुम्हाला उलट उत्तर देणार नाही. जर हिंमत आहे तर ममता बॅनर्जींविरोधात बोलून दाखवा. जर त्या योग्य आहेत तर मीही योग्यच आहे. जर त्यांना आपल्या वक्तव्यावर पश्चाताप असेल तर मलाही आहे. मला मान्य आहे की, ही बातमी खोटी आहे, पण त्या वक्तव्याचे काय जे त्यांनी २००२ मध्ये झालेल्या गोध्रा हत्याकांडवर केले होते. जर तुमच्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तर ते माझ्याकडेही आहे. कोणालाही पंतप्रधानांसह राजकारणाऱ्यांवर टीका करण्याचा अधिकार आहे. पण या सगळ्यात सैन्याला का गुंतवता?’ असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If she has freedom of expression i have too paresh rawal on arundhati roy
First published on: 03-06-2017 at 17:00 IST