एम.जे.अकबर यांच्या प्रकरणात महिलांवर अन्याय झाला असेल तर त्यांना न्याय मिळवून दिला जाईल असे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे. #MeToo मोहिमेतंर्गत केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप झाले आहेत. या विषयावर भाष्य करणारे नरेंद्र सिंह तोमर मोदी सरकारमधील तिसरे मंत्री आहेत.

एम.जे.अकबर यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर या विषयावर आम्ही आमचे मत मांडू असे तोमर म्हणाले. एम.जे.अकबर यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे निर्माण झालेल्या वादावर सरकार काय करणार ? असा प्रश्न तोमर यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले कि, जर अन्याय झाला असेल तर न्याय मिळवून दिला जाईल. ते इंडिया टुडेच्या कार्यक्रमात बोलत होते.

महिलांच्या सुरक्षिततेसाठी सरकार कटिबद्ध आहे असे त्यांनी सांगितले. आतापर्यंत सात महिला पत्रकारांनी एम.जे.अकबर यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. अकबर वृत्तपत्राचे संपादक असताना त्यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. अकबर सध्या नाजयेरिया दौऱ्यावर असून अजूनपर्यंत त्यांनी या आरोपांवर काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही.

काल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर झालेल्या लैंगिक छळाच्या आरोपांसंदर्भात त्यांनीच आपली बाजू स्पष्ट केली पाहिजे असे सांगितले.

सोशल मीडियावर ‘मी टू’ ही मोहीम सुरु झाल्यानंतर अनेक महिला पत्रकारांनी अकबर यांनी पत्रकारितेत असताना लैंगिक छळ केल्याचा आरोप केला. त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून याप्रकरणी मोदी सरकारने अद्याप मौन बाळगल्याने विरोधी पक्षांनी टीकेची राळ उडवली आहे. काँग्रेसने तर त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपातील काही सूत्रांनीदेखील अकबर नायजेरियावरून परतल्यावर राजीनामा देतील असा अंदाज वर्तवला आहे.

Story img Loader