नोटाबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिस्थिती सामान्य होण्यासाठी ५० दिवस मागितले होते. पण सध्या तरी तसे चित्र दिसत नाही. मग ५० दिवसानंतर मोदी पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार का असा सवाल तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला आहे.

नोटाबंदीच्या निर्णयाला ५० दिवस होत असतानाच मंगळवारी दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक पार पडली. बैठकीनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. मोदी सरकारने देशाला २० वर्ष मागे नेले आहे. कॅशलेस अर्थव्यवस्थेच्या प्रयत्नात मोदी सरकारच बेसलेस झाले अशी टीका त्यांनी केली. मोदी सरकार गरीबांकडून पैसा खेचून श्रीमंताचे कर्ज माफ करत असल्याची टीका त्यांनी केली. नोटाबंदीमुळे गरीबांना दोन वेळचं जेवण मिळणं मुश्किल झाल्याचे बॅनर्जींनी सांगितले. नोटाबंदीचा निर्णय म्हणजे अघोषित आणीबाणी आहे अशी टीका त्यांनी केली. मोदी सरकारला कसलीच भीती नाही. ते कसलीच चिंता करत नाही,  त्यांच्या मनात येतील तसे निर्णय घेतले जातात असे त्या म्हणाल्यात.

मोदींनी सत्तेवर येताना अच्छे दिन येतील असे सांगितले होते. हेच का तुमचे अच्छे दिन असा सवालच त्यांनी मोदींना विचारला. विरोधी पक्ष नोटाबंदीवरुन आता किमान सर्वंकष धोरण तयार करतील असे त्यांनी स्पष्ट केले.  याच पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनीही टीका केली. नोटाबंदीच्या निर्णयामुळे काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर निर्बंध आलेला नाही. नोटाबंदीमुळे शेतकरी आणि गरीबांचे हाल होत आहेत. दुसरीकडे दहशतवादी हल्लेही थांबू शकलेले नाहीत. त्यामुळे नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे फसल्याचे दिसते अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. आयकर विभागाने टाकलेल्या धाडीत गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांना उद्योग समुहांकडून पैसे मिळाल्याचे समोर आले होते. सहारा समुहाकडून मोदींना ४० कोटी रुपये आणि बिर्ला समुहाकडून १२ कोटी रुपये मिळाल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

दरम्यान, या बैठकीत विरोधकांमधील एकीचा अभाव दिसून आला. डावे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि जनता दल (संयुक्त) हे पक्ष या बैठकीत सहभागी झाले नाही.  इतर पक्षांशी चर्चा न करता वा त्यांना आमंत्रण न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याचा निर्णय काँग्रेसने घेतल्यामुळे विरोधी पक्ष नाराज झाले असून त्याचाच फटका काँग्रेसला अजूनही बसतो आहे.