लैंगिक शोषणाचे आरोप झाल्याने वादात अडकलेले अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांनी आता कुस्तीगीर मल्लांना हात जोडून आवाहन करत हवं तर मला फासावर लटकवा असं म्हटलं आहे. २३ एप्रिल पासून हे सगळे कुस्तीगीर आंदोलनाला बसले आहेत. तसंच बृजभूषण सिंह यांची पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या या आंदोलनाला काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे.
काय म्हटलं आहे ब्रिजभूषण सिंह यांनी?
“तुमच्यामुळे खेळ थांबला आहे, कुस्ती थांबली आहे. चार महिने सराव थांबला आहे तो सुरु करण्यात यावा. हवं तर मला फासावर लटकवा पण खेळ सुरु होईल असं पाहा. मी कुस्तीगीरांना हे आवाहन करतो आहे की ज्युनियर मल्लांचं आणि इतर मल्लांचं नुकसान करू नका. जे टुर्नामेंट करायचे आहेत ते तुम्ही करा किंवा सरकारने करावी किंवा फेडरेशनने खेळ पुन्हा सुरु करावा. चार महिने मल्लांचं नुकसान होतं आहे हे लक्षात घ्या. मला हवं तर फासावर लटकवा पण या लहान मुलांच्या भवितव्याशी खेळ करु नका. जे आत्ता ज्युनिअर आहेत त्यांच्या हातातून खेळाची एक संधी निघून जाईल ते होऊ देऊ नका.” असं म्हणत ब्रिजभूषण सिंह यांनी कुस्तीगीरांना आवाहन केलं आहे.
यानंतर ब्रिजभूषण सिंह पुढे म्हणाले की लवकरच खरं काय आणि खोटं काय ते समोर येईल. पोलिसांच्या अहवालाची थोडी वाट बघू. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष तीन महिन्यात दुसऱ्यांदा कुस्तीगीरांच्या निशाण्यावर आले आहेत. या सगळ्या कुस्तीगीरांनी भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकं मिळवून दिली आहेत. हे सगळे कुस्तीगीर आता जंतरमंतर या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहेत. यामध्ये विनेश फोगाट, बजरंग पुनिया, साक्षी मलिकसह अनेक महत्त्वाचे कुस्तीगीर आहेत.
२३ एप्रिलपासून कुस्तीगीरांचं आंदोलन सुरु
२३ एप्रिलपासून कुस्तीगीर दुसऱ्यांदा आंदोलन करत आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रियंका गांधींनी या आंदोलकांची भेट घेतली. तर सोमवारी नवजोत सिंग सिद्धू यांनी या कुस्तीगीरांची भेट घेतली. या सगळ्यांना प्रचंड पाठिंबा मिळतो आहे. तसंच तपास समितीवरही या सगळ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.