चिनी गुंतवणूक भारतामध्ये आणावी की नाही यासंदर्भात देशाचे एक धोरण ठरवण्याची गरज असल्याचे मत आपण पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या चर्चेमध्ये व्यक्त केलं होतं, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. जून महिन्यामध्ये १५ तारखेला राज्याच्या उद्योग विभागाच्यावतीने मॅग्नेटीक महाराष्ट्र २.० (भाग दोन) अंतर्गत १२ देशांतील गुंतवणुकदारांसोबत १६ हजार ३० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. त्याच कालावधीमध्ये १४ तारखेला भारत चीन सैन्यादरम्यान लडाखमधील गलवान येथील झालेल्या झटापटीमध्ये २० भारतीय जवान शहीद झाल्याने महाराष्ट्र सरकारने केलेल्या करारामध्ये सहभागी असलेल्या चिनी कंपनी सोबतचा करार स्थगित केल्याची बातमी समोर आली. याच सर्व प्रकरणासंदर्भात भारत आणि चीन संबंधांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतलेल्या सर्व पक्षिय बैठकीमध्ये आपण गुंवणुकीसंदर्भात स्पष्ट धोरण ठरवण्याची मागणी केल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची विशेष मुलाखत घेतली. याच मुलाखतीमध्ये त्यांनी आता गुंवणूक नाकारुन नंतर चिनी पंतप्रधानांबरोबर गळ्यात गळे घालून फिरु नये असा खोचक टोलाही लगावला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एक धोरण ठरवण्याची गरज…

“महाराष्ट्र सरकारने जे १६ हजार कोटींचे करार केले आहेत त्यामध्ये चीनची गुंतवणूक किती आहे?,” असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. यावर उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी चीनची गुंतवणूक किती ऐवजी असावी की नसावी हा मूळ प्रश्न असल्याचे मत मांडले. “चीनची गुंतवणूक असावी की नसावी हा महत्वाचा मुद्दा आहे. याचसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीन प्रश्नासंदर्भात एक व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली होती त्यावेळी मी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी मी देशाचे एक धोरण ठरवण्याची मागणी केली होती,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. पंतप्रधांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी चिनी मालावर बंदी घालण्याची मागणी केली होती असा खुलासाही उद्धव यांनी केला आहे.

नक्की वाचा >> मी घरात बसून राज्यासाठी १६ हजार कोटींची गुंतवणूक आणली : उद्धव ठाकरे

पाकिस्तानचेही दिले उदाहरण…

चिनी गुंतवणुकीला विरोध होत असल्याचे सांगताना उद्धव ठाकरेंनी पाकिस्तानचेही उदाहरण दिलं.  “आपल्याकडे काय होतं पाकिस्तानबरोबर जरा संबंध ताणले गेले पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तानबरोबर खेळ नको, क्रिडा नको, हे नको ते नको असं होतं. त्यानंतर हे जरा ओसरलं की खेळ आणि राजकारण किंवा कला आणि राजकारण एकत्र आणू नका असं बौधिक दिलं जातं. मात्र ताणलं जातं तेव्हा आपली भूमिका खबरदार जर टाच मारुनी अशी असते. मग खेळाडू पण नको, कलावंत नको आणि काही उद्योग पण नको अशी भूमिका असते. तसेच काहीतरी चीनबद्दल झालं आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

विरोध तुमचा आणि बंदूका शिवसैनिकांच्या हाती

पाकिस्तानविरोधात भूमिका घेताना शिवसेना कायमच आघाडीवर असल्याचेही उद्धव यांनी या मुलाखतीमध्ये नमूद केलं. “पाकिस्तानने आपल्याकडे घुसखोरी केली की पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडा, काहीच नको त्यात. पण काही दिवसांनी क्रिकेट मॅच, खेळाडू, गाणी, गझला, कलाकार, साहित्यिक येऊ द्या. त्यावेळी शिवसेनैकांविरोधातच पोलीस बंदूक रोखून उभे असतात. तुमचं वैर पाकिस्तानशी आणि बंदूका आमच्या छाताडावरती असं आहे हे. काही तरी तुमची निती ठरवा. फडफडणारी धोरणं गुंतवणुकदारांना या किंवा जा सांगत असतात,” असा टोला उद्धव यांनी लगावला आहे.

नक्की वाचा >>  “उद्योगधंद्यांबद्दल सरकारी धोरणे योग्य नसतील तर…”; मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा निशाणा 

आज विरोध आणि उद्या हिंदी चिनी भाई भाई नको…

चिनी वस्तू तर सोडाच उद्योगधंदे आणले पाहिजे की नाही हे देशाचे धोरण असलं पाहिजे, राष्ट्रभक्ती ही सर्व देशाची सारखीच असली पाहिजे. चिनी कंपन्यांबरोबरची गुंवणूक आपण होल्डवर ठेवली आहे. नसेल परवानगी तर द्या परत पाठवून. पण उद्या परत तुम्ही हिंदी चिनी भाई भाई म्हणत चिनी पंतप्रधानांच्या (राष्ट्राध्यक्षांच्या) गळ्यात गळे घालून मिरवणार असाल तर ही संधी घालवायची का असा प्रश्न आहे. आणि घालवायची असेल तर देशाची यासंदर्भातील दिशा ठरवा त्याच दिशेने आपण सर्व पुढे जाऊ,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारच्या चीनसंदर्भातील धोरणांवर टीका केली. “चीनच्या मुद्द्यावर आपण नेमकं काय करु शकतो? काही करण्याची आपली खरंच इच्छा आहे का? मला काही चिनी गुंतवणुकीचं मोठं आकर्षण नाही. पण आधी चीनसोबत जे काही चांगलं, वाईट नातं आहे ते किती काळ टिकणार आहे. आत्ता तुम्हाला चीन नको आहे…पण कालांतराने हिंदी-चिनी भाई भाई होणार नाही का?,” असे प्रश्न मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करताना उपस्थित केले आहेत.

अ‍ॅपवर बंदीबद्दल म्हणाले…

“आपण चिनी अ‍ॅपवर बंदी आणली आहे. पण आपण चीनला ‘अ‍ॅप’टला का ? ‘अ‍ॅप’टला असेल तर आपटणार कधी ? नुसती अ‍ॅप बंद करुन चीनला धडा शिकवत असू तर आनंदाची गोष्ट आहे,” असंही उद्धव ठाकरे या मुलाखतीमध्ये म्हणाले आहेत.

नक्की वाचा >> “तेव्हा मोदींनी सांगितलं होतं की, अशी योजना जाहीर करु नका ज्यामुळे…”; उद्धव ठाकरेंचा खुलासा

कोणते होते ते तीन करार…

महाराष्ट्र सरकारने मॅग्नेटीक महाराष्ट्र २.० (भाग दोन) अंतर्गत चीनच्या तीन कंपन्यांशी करार केला होता. यामध्ये हेंगली इंजिनिअरिंग ही चिनी कंपनी तळेगावमध्ये आपला कारखाना सुरु करणार होती. या माध्यमातून पुण्यातील औद्योगिक पट्ट्यामध्ये २५० कोटींची गुंवणूक करुन १५० जणांना रोजगार उपलब्ध होणार होता.  त्याचप्रमाणे चीनमधील ग्रेट वॉल मोटर्स ऑटोमोबाईल कंपनी तळेगावमध्येच तीन हजार ७७० कोटींची गुंतवणूक करुन २ हजार ४२ स्थानिकांना रोजगार देणार होती. पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्यूशन जेव्ही विथ फोटोन या तिसऱ्या चिनी कंपन्याबरोबरही १००० कोटींचा करार करण्यात आला होता. ही कंपनी तळेगावमध्ये कारखाना सुरु करणार होती. या कंपनीच्या माध्यमातून १५०० जणांना रोजगार मिळणार होता. मात्र हे तिन्ही करार सध्या स्थगित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनीच मुलाखतीमध्ये दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If we are opposing chinese investment we should have fix national policy about it say cm uddhav thackeray scsg