कर्नाटकात काँग्रेसची घोषणा
कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यास बेकायदा खाणकाम आणि भ्रष्टाचाराचे खटले चालविण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात येईल, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.
बेकायदा खाणकाम, जमिनी आरक्षणमुक्त करणे, जमीन बळकावणे या बाबतचे खटले चालविण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन केले जाईल आणि यामध्ये ज्यांचा हात आहे त्यांना कडक शासन केले जाईल, असे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी सांगितले.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभाराच्या चर्चेच्या वेळी सिद्धरामय्या यांनी, भाजपच्या सरकारला लक्ष्य केले. भाजपच्या राजवटीत भ्रष्टाचार मोठय़ा प्रमाणावर बोकाळल्याने राज्याची प्रतिमा मलीन झाल्याचा आरोपही या वेळी विरोधी पक्षनेत्यांनी केला. कर्नाटकमध्ये येत्या मे महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार असून, काँग्रेस पक्ष सत्तेवर येईल, असा विश्वास विरोधी पक्षनेत्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी या वेळी काँग्रेसवर टीका केली.
प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला पक्ष सत्तेवर येणार असल्याची आता दिवसाही स्वप्ने पडू लागली आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसून राज्यावर आवशयकतेपेक्षा कर्जाचा बोजा वाढला आहे, हा सिद्धरामय्या यांचा आरोप मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावला.
राज्याच्या अर्थसंकल्पाचे आकारमान वाढते तेव्हा सार्वजनिक ऋणही वाढते. त्यामुळे टीका करण्यात काहीच अर्थ नाही, असेही ते म्हणाले.

Story img Loader