काँग्रेसच्या कार्यकाळातील आतापर्यंतच्या विकास कामांचा आढावा घेत पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी यावेळच्या लोकसभा निवडणुकीतील विजय हा राहुल गांधींचाच असेल, असे म्हणत राहुल गांधींच्या प्रचारनेतृत्वाखाली पक्षाला यावेळी मोठे यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
राहुल गांधींमध्ये नेतृत्वाची क्षमता आहे. यात काहीच शंका नाही, असेही पंतप्रधान म्हणताच सभागृहात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींच्या जयघोषाने जोर धरला. शेवटी लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचा विजय हा राहुल गांधींचा विजय असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. कार्यकर्त्यांच्या वाढत्या दबावाची दखल घेत काँग्रेस पक्ष राहुल गांधींना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पंतप्रधानांनी आढावा घेतलेले महत्वाचे मुद्दे आणि त्याबद्दलचे त्यांचे स्पष्टीकरण
आर्थिक धोरणे
आर्थिक धोरणांच्या बाबतीत देशाने महत्त्वपूर्ण प्रगती साधली आहे. आर्थिक विकासामुळेच राज्यांना मिळणाऱया निधींमध्ये वाढ करता आली. तसेच जागतिक स्तरावर विकासदर स्थिर राखण्यात यशस्वी झालो.
शिक्षण
शिक्षणाच्या बाबतीतही काँग्रेसच्या कार्यकाळात अनेक स्तरांवर शिक्षण क्षेत्राचा विकास झाला. माध्यान्ह भोजन योजनेमुळे आज देशातील ११ कोटींहून अधिक मुलांना भोजन उपलब्ध करून देऊ शकलो. ही जागतिक पातळीवरील मोठी योजना आहे. गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्यांमध्येही गेल्या काही वर्षांपासून वाढ होत आली आहे, असेही पंतप्रधान म्हणाले
महागाई, भ्रष्टाचार
महागाई कमी करण्यात अपयशी ठरलो, हे सत्य जरी असले, तरी त्यावर नियंत्रण ठेवण्याचे पुरेपुर प्रयत्न काँग्रेसने केले. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेवर अनेकवेळा चिखलफेक झाली. परंतु, माहितीचा अधिकार, लोकपाल अशा प्रकारचे कायदे संमत करण्यात काँग्रेसची महत्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला नष्ट करण्याचेच काँग्रेसचे उद्दिष्ट असल्याचे सिद्ध होते. महागाईच्या बाबतीत सर्वसामन्यांमध्ये चिंता व्यक्त होणे सहाजिकच आहे. याचीही आम्हाला जाणीव आहे आणि त्यादृष्टीने आम्ही सतत प्रयत्न करत आलो आहोत.
वाढत्या महागाईच्या प्रमाणात देशातील नागरिकांच्या उत्पन्नातही तितक्याच प्रमाण वाढ झाली आहे. असेही पंतप्रधान म्हणाले.
बांधकाम
बांधकामाच्या बाबतीत काँग्रेस कार्यकाळात १० नवी विमानतळे, मेट्रो, मोनो रेल्वे , अनेक लांबपल्ल्याचे महामार्ग , शासकीय रुग्णालये, सागरी पूल उभारण्यात आले आहेत. यावरून काँग्रेसची विकासाची भूमिका लक्षात येते.
भाषणाच्या शेवटी पंतप्रधानांनी आजपर्यंत दिलेल्या पाठिंब्याबद्दल सोनिया गांधींचे आभार व्यक्त करत सोनिया गांधींच्या नेतृत्वामुळे आम्हाला चांगले बळ मिळत असल्याचे सांगितले. तसेच राहुल गांधींमुळे पक्षात उत्साहाचे वातावरण आहे. येत्या निवडणुकीत विजय नक्की असून, त्यानंतर या उत्साहात आणखी भर पडेल, असेही पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले.