रोजगार देणारे मालक आता कर्मचारी निवडीसाठी सोशल मीडिया संकेतस्थळांचा जास्त वापर करीत आहेत. या अभ्यासानुसार तुम्हाला नोकरीसाठी कॉल द्यायचा की नाही हे ठरवताना सोशल नेटवर्किंग संकेतस्थळावर रोजगार मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवाराची उपस्थिती आवश्यक आहे.  एका जागतिक सॉफ्टवेअर कंपनीने केलेल्या पाहणीनुसार ९० टक्के मनुष्यबळ व्यावसायिक हे उमेदवाराची सुयोग्यता बघताना असुरक्षित सोशल मीडिया प्रोफाइल्स बघतात.
जेव्हा रोजगार देणारे किंवा मनुष्यबळ विभागातील लोक उमेदवारांची निवड करतात तेव्हा उमेदवाराची मुलाखत घेतली तर त्याला नेमकी किती संधी मिळेल याचाही अंदाज घेत असतात, असे ‘बिझिनेस डेली’ ने या पाहणी अहवालाच्या आधारे दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. अमेरिका व इंग्लंडमधील २३० मनुष्यबळ निवड व्यावसायिक व १८ ते २५ वयोगटातील  ४४०० रोजगार इच्छुक तरूण-तरूणींची माहिती यात घेण्यात आली होती. त्यात असे दिसून आले की, ज्या लोकांचे सोशल मीडिया संकेतस्थळावरील फोटो हे अजागळ व अव्यवस्थित स्वरूपातील असतात त्यांना मुलाखतीचा कॉल मिळण्याची शक्यता ही ८४ टक्के कमी होते. नव्वद टक्के मनुष्यबळ विकास व्यवस्थापक हे उमेदवाराचे नग्न फोटो साईटवर असतील तर त्यांना मुलाखतील बोलावत नाहीत. अगोदरच्या मालकाविषयी शिवीगाळ, वांशिक विषयावर अतिरेकी मते प्रदर्शित करणाऱ्यांना नोकरीचा कॉल मिळण्याची संधी खूपच कमी असते. तुमचे ऑनलाइन प्रोफाइल जर योग्य नसेल तरी तुम्हाला संधी नाकारली जाण्याची शक्यता ५० टक्के असते. ‘एव्हीजी टेक्नॉलॉजीज’ चे टोनी अ‍ॅन्सकॉम्बे यांनी सांगितले की, इंटरनेट व सोशल नेटवर्क यामुळे मनुष्यबळ निवडीची पद्धत खूपच बदलून गेली आहे. आजकाल उमेदवाराची ऑनलाइन माहिती हीच उमेदवाराची पहिली मुलाखत असते. चांगल्या मनुष्यबळाच्या शोधात असलेले व्यवस्थापक हे फेसबुकच नव्हे तर गुगल, लिंकडइन, ट्विटर, इन्स्टाग्राम व फ्लिकर या संकेतस्थळांकडेही मोर्चा वळवित आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनुष्यबळ व्यवस्थापक काय बघतात-
तुमचे ऑनलाईन प्रोफाईल चांगले असावे.
नग्न व वाईट फोटो नसावेत.
अगोदरच्या मालकाला शिवीगाळ केलेली नसावी.
फेसबुक शिवाय ते गुगल, लिंकडइन, ट्विटर, इन्स्टाग्राम व फ्लिकर याकडेही त्यांचे लक्ष असते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If you are on facebook then you will get a call for job