मी कुणाच्याही जबरदस्तीमुळे वंदे मातरम म्हणणार नाही, असे वक्तव्य करून काँग्रेसचे उत्तराखंडमधील नेते किशोर उपाध्याय यांनी भाजपला आव्हान दिले आहे. भाजपची स्थापन होण्यापूर्वी देशातील लोक वंदे मातरम् म्हणत नव्हते का?, आपल्या देशातील लोक गेल्या अनेक वर्षांपासून वंदे मातरम म्हणत आले आहे. मात्र, सध्या काहीजण इतरांकडून जबरदस्तीने वंदे मातरम् वदवून घेत आहे. मात्र, माझ्यावर कोणी अशी जबरदस्ती केली तर मी कदापि वंदे मातरम् म्हणणार नाही. त्यानंतर तुम्ही मला उत्तराखंडमधून बाहेर फेकूनच दाखवा, असे आव्हान किशोर उपाध्याय यांनी भाजपला दिले.
काही दिवसांपूर्वी उत्तराखंडचे शिक्षणमंत्री धन सिंह रावत यांनी उत्तराखंडमध्ये राहायचे असल्यास राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत गायलाच लागेल, असे म्हटले होते. राज्यातील सर्व शिक्षण संस्थांमध्ये राष्ट्रगीताचे गायन बंधनकारक करण्याबद्दलही त्यांनी सुतोवाच केले होते. त्यांचे हे आव्हान स्विकारताना किशोर उपाध्याय यांनी मी कोणत्याही कार्यक्रमात वंदे मातरम् म्हणणार नसल्याचे जाहीर केले. काँग्रेस आणि भाजपमधील या वादामुळे उत्तराखंडमधील राजकारण चांगलेच तापले आहे. दरम्यान, भाजप नेते अजय भट यांनी उपाध्याय यांच्या वक्तव्यावर टीका करताना हे विधान काँग्रेसची संस्कृती दाखवणारे असल्याचे म्हटले.
काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात वंदे मातरमला राष्ट्रीय गीताचा दर्जा दिला जावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती. कायद्यात राष्ट्रीय गीत अशी संकल्पनाच अस्तित्त्वात नाही. त्यामुळे ‘वंदे मातरम’ला राष्ट्रीय गीत घोषित करून ते वाजवण्याचे आदेश देता येणार नाहीत, असे न्यायालयाने म्हटले होते. न्यायालयाने राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायदा आणि संविधानातील तरतुदींचा दाखला देत ही याचिका फेटाळून लावली. संविधानातील ५१ ए या कलमात केवळ राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचाच उल्लेख आहे. या कलमात राष्ट्रीय गीतासंदर्भात कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे आम्ही कोणत्याही वादाला आमंत्रण देऊ इच्छित नाही, असे न्यायमूर्ती आर. बानूमथी व न्यायमूर्ती मोहन एम. शांतागौडार यांनी म्हटले. तसेच या खंडपीठाने याचिकाकर्त्यांची कार्यालये, न्यायालये, विधिमंडळ आणि संसदेत राष्ट्रगीत वाजविण्याची मागणीही फेटाळून लावली. मात्र, शाळांमध्ये राष्ट्रगीताची सक्ती करण्याच्या विनंतीचा विचार करु असे न्यायालयाने सांगितले होते.