केंद्रीय तपास यंत्रणांकडून तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांना अटक करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपाला थेट इशारा दिला आहे. तुम्ही आमच्या चार नेत्यांना अटक केली, तर आम्ही भाजपाच्या आठ लोकांना अटक करून तुरूंगात पाठवू, असं विधान ममता बॅनर्जी यांनी केलं आहे.
कोलकाता येथील नेताजी इनडोअर स्टेडियममध्ये तृणमूल काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीला तृणमूल काँग्रेसचे खासदार, आमदार आणि अन्य नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, “तुम्ही आमच्या चार आमदारांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरूंगात पाठवले आणि बदनामी केली, तर तुमच्या आठ जणांना खून आणि अन्य प्रकरणात तुरूंगात पाठवेल.”
हेही वाचा : ‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरणात महुआ मोईत्रांची ममता बॅनर्जींकडून पाठराखण; म्हणाल्या, “आगामी निवडणुकीत…”
“आमच्या पक्षातील अनुब्रता मंडोल, पार्थ चॅटर्जी, माणिक भट्टाचार्य, ज्योती प्रिया मल्लिक आणि अन्य नेते तुरूंगात असल्याने तुम्ही हसत आहात. भविष्यात तुमच्याकडे सत्ता नसल्यावर तुरूंगात असाल,” असा इशाराही ममता बॅनर्जींनी दिला आहे.
हेही वाचा : अभिषेक बॅनर्जींना नौशाद सिद्दीकींचे आव्हान; ममता बॅनर्जींच्या भाच्यासाठी लोकसभेची निवडणूक खडतर?
“केंद्रात सत्तेत असल्यामुळे तुम्हाला काहीही कराल, असं वाटतं. तुम्ही तृणमूल काँग्रेस, अरविंद केजरीवाल, अशोक गेहलोत यांचा मुलगा आणि अन्य नेत्यांविरोधात ईडी, सीबीआयचा वापर करत आहात. आगामी काळात तेच अधिकारी तुमची चौकशी करतील. तेव्हा, तुम्हाला कुणीही वाचवणार नाही,” असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं.