बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत वेगवेगळ्या कारणांमुळे कायम चर्चेत असतात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातून कंगना रणौत खासदार झाल्या आहेत. अभिनेत्री ते खासदार हा त्यांचा प्रवास कायम चर्चेत राहिला. आता कंगना रणौत पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. खासदार झाल्यानंतर त्यांच्याकडे अनेक लोक स्वतःची कामं घेऊन येतात. मात्र, कंगना रणौत यांनी आपल्याला भेटण्यासाठी लोकांनी आपले आधार कार्ड बरोबर घेऊन यावे, असं म्हटलं आहे. त्यांच्या या विधानानंतर विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कंगना रणौत यांनी काय म्हटलं?

“हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघात माझं कार्यालय आहे. प्रत्येकाने आपल्या समस्या किंवा तक्रारी कागदावर लिहून ठेवल्यास त्या ऐकणं आणि समजून घेणं सोप्प होईल. अनेकवेळा पर्यटक भेटायला येतात आणि सर्वसामान्यांची गैरसोय होते. त्यामुळे मंडी मतदारसंघ क्षेत्रातील आधार कार्ड बरोबर घेऊन यावं. तसेच तुमचं जे काम असेल ते एका कागदावर लिहून आणा. याचं कारण म्हणजे कोणालाही काही अडचण येऊ नये. अन्यथा काय होतं की पर्यटक जास्त येतात. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना अडचण निर्माण होते. त्यामुळे मंडी मतदारसंघ क्षेत्रातील आधार कार्ड आणि कामासंदर्भातील लेटर बरोबर आणा”, असं कंगना रणौत यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : मणिपूर मुद्द्यावर सरकारवर दबाब आणू; राहुल गांधी यांचे आश्वासन, पंतप्रधानांवर पुन्हा टीका

दरम्यान, भाजपाच्या खासदार कंगना रणौत यांच्या आधार कार्ड बाबतच्या वक्तव्यावरून हिमाचल प्रदेशमध्ये चांगलंच राजकारण तापलं आहे. त्यांच्या या विधनानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच काँग्रेसकडून कंगना रणौत यांच्यावर टीका करण्यात आली आहे.

विक्रमादित्य सिंग काय म्हणाले?

काँग्रेस नेते विक्रमादित्य सिंग यांनी कंगना रणौत यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “लोकप्रतिनिधीला कुणीही भेटू शकतो. कारण लोकांच्या समस्या दूर करणं ही जबाबदारी लोकप्रतिनिधीची असते. त्यामध्ये सर्व समाजातील लोकांना भेटणं त्यांची कामे करणं ही त्यांची जबाबदारी आहे. मात्र, त्यांना भेटण्यासाठी आधार कार्ड बरोबर आणावं असं सांगण्याची गरज नाही”, अशी टीका काँग्रेसचे नेते विक्रमादित्य सिंग यानी केली.

महिला कॉन्स्टेबलने लगावली होती कानशिलात

हिमाचलच्या मंडी या मतदारसंघातून भाजपाच्या खासदार म्हणून निवडून आलेल्या अभिनेत्री कंगना रणौत यांना चंदीगढ विमानतळावर काही दिवसांपूर्वी एका अपमानजनक प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. एका सीआयएसफच्या महिला कॉन्स्टेबलने त्यांच्या कानशिलात लगावली होती. या घटनेची चांगलीच चर्चा झाली होती. कंगना रणौत यांना कानशिलात लगावल्याची घटना घडली, यामुळे मोठी खळबळ उडाली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If you want to meet me bring aadhaar card bollywood actress and bjp mp kangana ranaut statement gkt