AIMIM चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी हे त्यांच्या बिनधास्त आणि बेधकड वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. आता त्यांनी केलेलं एक वक्तव्य पुन्हा चर्चेत आलं आहे. असदुद्दीन ओवैसी यांनी आपल्या भाषणात पुरुषांना पत्नीशी कसं वागायचं? ती ओरडली तर काय करायचं? याबाबतचा सल्ला दिला आहे. तसंच तुमची मर्दानगी नेमकं काय करण्यात आहे ते देखील सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले असदुद्दीन ओवैसी?

“पुरुषांनी त्यांच्या पत्नीशी वागणूक चांगली ठेवली पाहिजे. एक लक्षात ठेवा की कुराणमध्ये असं काहीही सांगितलेलं नाही की पत्नी तुमचे कपडे धुणार, तिने तुमच्यासाठी स्वयंपाक करायचा आहे. इतकंच काय तुमचं डोकं दुखत असेल तर डोकं दाबून देणं हेदेखील पत्नीचं काम नाही. कुराण हेदेखील सांगतं की पतीचा पत्नीच्या कमाईवर कुठलाही हक्क नाही. पण पतीच्या कमाईवर पत्नीचा हक्क असतो. कारण पत्नीला घर चालवायचं असतं.”

काही लोक पत्नीवर टीका करतात पण ते योग्य नाही

काही लोक त्यांच्या पत्नीवर टीका करतात, तिच्याविषयी सोशल मीडियावर लिहितात. इतकंच काय तिने जेवणच चांगलं तयार केलं नाही, तिने केलेल्या स्वयंपाकात खोड्या काढतात. काही पुरुष तर रागातून पत्नीवर हातही उचलतात. मी त्या सगळ्यांना सांगू इच्छितो की हे असं वागणं सोडा. तुम्ही जर मोहम्मद पैगंबरांना मानत असला तर पत्नीवर किंवा कुठल्याही महिलेवर हात उचलू नका. पैगंबरांनी कधीही कुणावरही हात उचलला नाही.

पत्नीवर राग काढणं, तिने केलेल्या स्वयंपाकात खोड्या काढणं ही काही मर्दानगी नाही. काही लोक काहीच कारण नसताना पत्नीवर राग काढतात. असं करण्यातही कुठलंही पौरुषत्व नाही.

हे पण वाचा- “बाबरी मशीद माझी होती, आहे आणि राहिल, महात्मा गांधींनीही राम मंदिराचा उल्लेख…”; असदुद्दीन ओवैसी यांचं वक्तव्य

पैगंबाराची गोष्ट सांगत काय म्हणाले ओवैसी?

यानंतर ओवैसी यांनी मोहम्मद पैगंबर यांचा एक किस्सा सांगितला. पैगंबरांकडे एक माणूस त्याच्या पत्नीची तक्रार घेऊन गेला. त्यांना तो हे सांगणार होता की माझी पत्नी माझ्यावर खूप चिडते. पण जेव्हा तो पैगंबर यांच्या घरी गेल्या तेव्हा त्याने पाहिलं की पैगंबर यांची पत्नी त्यांच्यावर चिडली आहे. हे पाहून तक्रार घेऊन येणारा माणूस परत जाऊ लागला. तेवढ्यात पैगंबर बाहेर आले आणि त्याला विचारलं की काय झालं? त्यावर तो म्हणाला मी तुमच्याकडे माझ्या पत्नीची तक्रार घेऊन आलो होतो. पण तुमच्या घरीही तेच चाललं आहे हे पाहून मी आता परत घरी चाललो आहे. त्यावर पैगंबर म्हणाले, ती माझी पत्नी आहे. तिने माझ्या मुलांना जन्म दिला आहे. ती घर सांभाळते. ती देखील एक माणूस आहे. ती जर चिडली तर मी ऐकून घेतो. मी आज याच गोष्टीचं उदाहरण देत तुम्हाला सांगतोय की तुमची बायको जर तुमच्यावर ओरडली, चिडली तर तिचं ऐकून घ्या. तिला समजून घ्या. असा सल्ला ओवैसी यांनी दिला आहे. त्यांचं हे म्हणणं सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If your wife shouts at you asaduddin owaisi relationship advice scj