Online Mobile Purchase Scam: सायबर फसवणुकीचे अनेक प्रकार आतापर्यंत आपण पाहिले असतील. ऑनलाईन शॉपिंगचे प्रस्थ वाढल्यानंतर या माध्यमातूनही अनेकांची फसवणूक होऊ लागली आहे. मात्र आता फसवणुकीचा एका नवा घोटाळा समोर आला आहे. या नव्या पद्धतीत घोटाळेबाज चक्क आपल्या समोर येतात, आपल्याकडून पैसे घेतात आणि आपण मागविलेल्या वस्तूंऐवजी भलतंच सामान आपल्या हाती देऊन परागंदा होतात. दिल्लीत एका तरूणानं ऑनलाईन मोबाइल विकत घेतला होता. त्याच्याबरोबर ही अजब घटना घडली आहे. मोबाइलऐवजी या तरुणाला बॉक्समधून साबण आणि बिस्किटाचा पुडा देण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रकरण नेमके काय आहे?

दक्षिण दिल्लीतील शेख सराई भागात राहणाऱ्या एका तरुणानं ११ फेब्रुवारी रोजी ऑनलाईन मोबाइल विकत घेतला होता. ज्याचा पेमेंट पर्याय कॅश ऑन डिलिव्हरी ठेवला. दुसऱ्या दिवशी तरुणाला एका मुलाचा फोन आला, ज्याने स्वतःला डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगितले. “मी त्याला दुसऱ्या दिवशी फोन डिलीव्हर करण्यास सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता त्यानं मला तीनवेळा फोन केला. त्यानंतर घरी येऊन त्यानं मला मोबाइल दिला. ज्या साईटवरून मी मोबाइल मागितला होता, त्याच साईटचं ब्रँडिंग असलेल्या बॉक्समध्ये मला मोबाइल मिळाला. तसेच बॉक्सवर मी मागितलेल्या ऑर्डरची माहितीही होती”, असे फसवणूक झालेल्या तरुणाने सांगितले.

आपण ऑर्डर केलेला मोबाइलच आला असावा, असे वाटल्यामुळे तरुणाने १६,६८० रुपये युपीआय व्यवहाराद्वारे पाठविले. त्यानंतर मोबाइलचा बॉक्स घेऊन तो ऑफिसला गेला. तिथे त्याने बॉक्स उघडल्यानंतर त्याला धक्काच बसला. कारण आतमध्ये साबणाची वडी आणि बिस्किटचा पुडा होता. धक्का बसलेल्या तरुणाने डिलिव्हरी बॉयला फोन केला, तर त्याचा फोन स्विच ऑफ असल्याचे कळले. तसेच ज्या साईटवरून मोबाइल विकत घेतला होता, त्यांनाही ईमेल करून माहिती दिली. पण त्यांचेही उत्तर आले नाही.

सदर तरुणाला दुसरा धक्का दुसऱ्या दिवशी मिळाला. जेव्हा आणखी एक डिलिव्हरी बॉय दुसऱ्या दिवशी मोबाइल फोन डिलिव्हरी करण्यास घेऊन आला. त्यानेही १६,६८० रुपये मागितले. यानंतर हा एकप्रकारचा घोटाळा असल्याची जाणीव सदर तरूणाला झाली. त्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पण आरोपींकडे ज्या मोबाइलची ऑर्डर दिली आहे, त्याची अचूक माहिती कशी काय लागली? याबद्दल अद्यापही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.