नवी दिल्ली : राजस्थानातील निवडणूक व्यवस्थापन समिती व जाहीरनामा समितीची घोषणा भाजपने गुरुवारी केली. मात्र, या दोन्ही समित्यांमध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांना स्थान देण्यात आले नसल्याने तर्कवितर्क केले जात आहेत. पक्षाने अजून निवडणूक प्रचार समिती जाहीर केलेली नसून या समितीची धुरा वसुंधराराजेंकडे दिली जाण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्रीपदाचे दावेदार व केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्र सिंह शेखावत, प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी, माजी प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनाही दोन्ही समित्यांमधून डावलण्यात आले आहे. निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी स्थापन केलेल्या दोन प्रमुख समितींपासून वसुंधराराजेंना बाजूला ठेवण्यात आल्याबद्दल प्रभारी अरुण सिंह यांनी, ‘पक्षातील अन्य नेते प्रचारामध्ये सहभागी होतील’, असे सांगितले. केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी, ‘वसंधुराराजेंना पक्षाच्या अनेक कार्यक्रमामध्ये सामावून घेतले आहे, भविष्यातही त्यांना सहभागी करून घेऊ’, असे सांगितले. वसुंधराराजेंनी मात्र अजून प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा केंद्रीय संसदीय राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांच्या नेतृत्वाखाली तयार केला जाणार आहे. मेघवाल हे राज्यातील भाजपचे प्रमुख दलित नेते आहेत. निवडणूक व्यवस्थापन समितीची जबाबदारी प्रदेश उपाध्यक्ष नारायण पंचारिया यांच्याकडे आहे. वसुंधराराजे यांचे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी असलेले मतभेद कायम आहेत. तरीही, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गेल्या महिन्यामध्ये मॅरेथॉन बैठकांमध्ये वसुंधराराजे यांच्याशी दिल्लीत सविस्तर चर्चा केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यातील जाहीर सभांमध्येही त्या सहभागी झाल्या होत्या. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून केंद्रीय नेतृत्वाने आपल्या नावाची घोषणा करावी, असे त्यांनी सूचित केले असले तरी, ही विनंती अद्याप पक्षाने मान्य केलेली नाही.