IIM-Bangalore Student Dies: बंगळुरुच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये शिक्षण घेणाऱ्या २९ वर्षीय विद्यार्थ्याचा वसतिगृहात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ५ जानेवारी रोजी वाढदिवस साजरा केल्यानंतर निलय कैलाशभाई पटेल नामक विद्यार्थी दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीमधून खाली पडला. मित्रांसमवेत वाढदिवस साजरा केल्यानंतर काही तासांतच ही घटना घडली. निलय पटेल हा मुळचा गुजरातमधील सूरत येथे राहणारा होता. बंगळुरु आयआयएममध्ये तो व्यवस्थापन क्षेत्राची पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत होता.
पोलिसांनी सांगितले की, निलयने मित्राच्या खोलीत केक कापून वाढदिवस साजरा केला, त्यानंतर तो मध्यरात्री आपल्या खोलीत आला होता. सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास वसतिगृहाच्या इमारतीसमोर त्याचा मृतदेह आढळून आला. वाढदिवस साजरा केल्यानंतर आपल्या खोलीत येत असताना दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून तो खाली कोसळला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. सकाळी सुरक्षा रक्षकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले, मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
हे वाचा >> “हे ओयो नाही, इथं…”, रिक्षाचालकाचा कपल्सना थेट इशारा; व्हायरल ‘पाटी’पाहून पोट धरून हसाल
या प्रकरणी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील तपासाची दिशा ठरविणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पीटीआय वृत्तसंस्थेबरोबर बोलत असताना पोलिसांनी सांगितले की, आम्ही शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहोत. तीन दिवसांनी अहवाल प्राप्त होईल. या अहवालातूनच मृत्यूचे निश्चित कारण समजू शकेल.
निलयच्या आकस्मिक मृत्यूमुळे बंगळुरुच्या आयआयएम संकुलात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. निलय पटेल हा अतिशय हुशार आणि चुणचुणीत विद्यार्थी होता, अशी आठवण त्याच्या मित्रांनी सांगितली. आयआयएम बंगळुरुने एक्सवर पोस्ट टाकून त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे संपूर्ण संस्थेवर शोककळा पसरली असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले.