Girls Spoke On Domestic Violence Against Brother : गेल्या काही दिवसांत देशभरातून परुषांवर पत्नीकडून होणाऱ्या अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. गेल्या महिन्यात बंगळुरूतील तंत्रज्ञ अतुल सुभाष यांनी पत्नी आणि सासरच्या लोकांवर मानसिक छळाचे आरोप करत आत्महत्या केली होती. त्यानंतर दिल्लीतील एका युवा उद्योजकानेही पत्नी आणि सासरच्या लोकांवर आरोप करत आत्महत्या केली होती. आता पतीवर पत्नीद्वारे होणाऱ्या अत्याचाराचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे.

आयआयएम अहमदाबादच्या पदवीधर असलेल्या प्रत्युषा चल्ला यांनी त्यांच्या वहिनीवर गंभीर आरोप करत, तिने खंडणी वसूल करण्यासाठी भावाला कसा त्रास दिला याचा अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून मांडला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एक्स वर या व्हिडिओखाली अनेक संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

या व्हिडिओमध्ये, प्रत्युषा चल्ला यांनी तिच्या भावाच्या १० दिवस टिकलेल्या विवाहाबद्दल आणि वहिनीकडून कुटुंबाला झालेल्या त्रासाबद्दलचे अनुभव सांगितले आहेत.

प्रत्युषा चल्ला या व्हिडिओमध्ये म्हणाल्या की, “माझा भाऊ, हैदराबादच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक आहे. त्याने २०१९ मध्ये राजमुंद्री येथील एका महिलेशी लग्न केले होते. पण, हे लग्न फक्त १० दिवसच टिकले.”

भावाला बेडरूममध्येही येऊ देत नव्हती

यावेळी चल्ला यांनी आरोप केले की, “भावाची पत्नी माझ्या पालकांशी गैरवर्तन करायची, त्यांना अपशब्द वापरायची, इतकेच नव्हे तर माझ्या भावाला बेडरूममध्येही येऊ देत नव्हती. ती अनेकदा आत्महत्येची धमकी देत ​​असे. माझ्या वहिनीने तिची बहीण, भाऊ आणि प्रियकराबरोबर आमच्याकडून खंडणी वसूल करण्याची योजना आखली होती. आमचे घर सोडल्यानंतर काही दिवसांनी, तिने आमच्याविरुद्ध कौटुंबीक हिंसाचाराची तक्रार दाखल केली. त्यानंतर कोणत्याही तपासाशिवाय आमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.”

हे ही वाचा : “मी देव नाही… माझ्याकडूनही चुका होतात”, पंतप्रधान मोदी पॉडकास्टमध्ये पहिल्यांदाच झळकणार

पाच वर्षांनंतरही खटल्याची सुनावणी नाही

दरम्यान प्रत्युषा चल्ला यांनी, ही घटना पाच वर्षांपूर्वीची असल्याचे सांगितले आहे. पाच वर्षे उलटूनही या खटल्याची सुनावणी सुरू झाली नसल्याने कुटुंबीयांना याचा त्रास होत असल्याचेही त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

आयआयटी आणि आयआयएमच्या पदवीधर असलेल्या चल्ला यांनी व्हिडिओच्या शेवटी सांगितले की, “या घटनेला आता पाच वर्षे उलटली आहे. तरीही या खटल्याची सुनावणी सुरू झालेली नाही. यामुळे कुटुंबीयांना खूप त्रास होत आहे. यामुळे पालकांची तब्येतही खालावली आहे.”

Story img Loader