Baba Abhay Singh: महाकुंभ मेळ्यात अस्खलित इंग्रजी बोलणारे आणि आयआयटीमधून शिक्षण घेतलेले अभय सिंह हे अल्पावधित लोकप्रिय झाले. सोशल मीडियावर अभय सिंह यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. त्यानंतर दोन दिवसांपासून बाबा अभय सिंह महाकुंभ सोडून गेल्याची अफवा उठली होती. यावर आता अभय सिंह यांनीच भाष्य केले आहे. महाकुंभमधील जुना आखाड्याच्या १६ मडी आश्रममधून ते अचानक एका अज्ञात स्थळी निघून गेले होते. आश्रमातील साधूंनी माझ्याबद्दल अफवा पसरवली, असा आरोप अभय सिंह यांनी केला आहे. अभय सिंह यांचे आई-वडील त्यांना शोधण्यासाठी १६ मडी आश्रम आले होते, मात्र ते येण्याआधीच अभय सिंह तिथून निघून गेल्याचेही सांगितले जाते.
जुना आखाड्याच्या १६ मडी आश्रमातील इतर साधूंनी सांगितले की, अभय सिंह प्रसारमाध्यमांना मुलाखती देत सुटले होते. यावेळी त्यांनी नको त्या विषयावरही भाष्य केले, जे त्यांनी करायला नको होते. त्यांना जुना आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर अवधेशानंद गिरी यांच्याकडेही घेऊन जाण्यात आले होते. अभय सिंह यांची मानसिक स्थिती पाहता जुना आखाड्याने त्यांना आश्रम सोडण्याचे निर्देश दिले. त्यानंतर ते आश्रमातून निघून गेले.
आयआयटीवाला बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभय सिंह यांनी आज तक वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हटले, “त्यांनी (आश्रम) माझ्याबद्दल चुकीची बातमी पसरवली आहे. त्यांनी मला रात्रीच तिथून निघून जाण्यास सांगितले. त्यांना वाटते की, मी प्रसिद्ध झालो आहे. त्यामुळे जर त्यांच्यातल्या काही गोष्टी माहीत झाल्या तर मी विरोधात जाईल. त्यामुळे त्यांनी मी गुप्त साधनेसाठी गेलो असल्याचे सांगून टाकले. ते लोक काहीही बरळत आहेत.”
अभय सिंह यांचा जुना आखाड्यात प्रवेश कसा झाला? याबाबत माहिती देताना आखाड्याचे संत सोमेश्वर पुरी यांनी सांगितले की, अभय सिंह त्यांना वाराणसीमध्ये भटकत असताना सापडले होते. त्यांनीच अभय सिंह यांना आश्रमात आणले. याबद्दल जेव्हा अभय सिंह यांना विचारण्यात आले. तेव्हा ते म्हणाले की, कुणी सांगितले ते माझे गुरु आहेत. हेच तर होत आले आहे. आता मी प्रसिद्ध झालो तर त्यांनी स्वतःला माझे गुरू बनवून टाकले. पण मी त्यांना आधीच सांगितले होते की, आपल्यात गुरु-शिष्याचे नाते नाही.
कोण आहेत आयआयटी बाबा अभय सिंग?
मूळचे हरियाणाचे असलेल्या अभय सिंग यांनी आयआयटी मुंबईतून अभियांत्रिकीची पदवी घेतली. शिक्षण सुरू असताना त्यांना तत्त्वज्ञानात रस निर्माण झाला आणि यातूनच त्यांनी प्लेटो, सॉक्रेटिस यांच्या कार्यांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. पुढे त्यांनी आधुनिकतेचा शोध घेऊन जीवनाचे सखोल आकलन करण्याचा प्रयत्न केला.
अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, अभय सिंग यांनी डिझाइनमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आणि फोटोग्राफीद्वारे त्यांनी त्यांचा छंदही जोपासला. त्यांची शैक्षणिक आणि कलात्मक कामगिरी दमदार असूनही, त्यांना जाणवले की, त्यांचे खरे ध्येय अध्यात्म आहे.