आयआयटी बीएचयूमध्ये दोन महिन्यांपूर्वी झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातीत तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. बलात्काराच्या घटनेनंतर आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांना तब्बल ६० दिवस लागले. तिन्ही आरोपींनी २ नोव्हेंबरच्या मध्यरात्री आयआयटी बीएचयूच्या आवारात घुसून एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केले होते. या तीन नराधमांनी बंदुकीचा धाक दाखवून विद्यार्थिनीला कपडे काढायला सांगितले. आरोपींनी या विद्यार्थिनीचा कपडे काढत असतानाचा व्हिडीओ चित्रित केला होता. पोलिसांनी या तिघांच्याही मुसक्या आवळल्या आहेत.
हे तिन्ही आरोपी वाराणसीतले रहिवासी आहेत. कुणाल पांडेय, अभिषेक चौहान, सक्षम पटेल अशी या तीन नराधमांची नावं आहेत. विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचारांप्रकरणी न्यायालयाने तिन्ही आरोपांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, या आरोपींचे आणि भाजपाचे संबंध समोर आले आहेत. तिन्ही आरोपींच्या अटकेनंतर या तिघांचे स्थानिक भाजपा नेते, आयटी सेलचे प्रमुख आणि भाजपा पदाधिकाऱ्यांबरोबरचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षांच्या टीकेच्या केंद्रस्थानी आहे. विरोधी पक्षांच्या वाढत्या दबावानंतर भाजपाने या तिन्ही तरुणांवर पक्षांतर्गत कारवाई केली आहे. पक्षाने तिन्ही आरोपींना पक्षातून निष्कासित केलं आहे.
याप्रकरणी भाजपाचे वाराणसी जिल्हाध्यक्ष हंसराज विश्वकर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विश्वकर्मा म्हणाले, “एका गुन्ह्यात या तिघांचं नाव आलं आहे. त्यामुळे पक्षाच्या आदेशानुसार आम्ही या तिघांनाही पक्षातून निष्कासित केलं आहे. याप्रकरणी पक्ष जो आदेश देईल त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.” हे तिन्ही तरुण भारतीय जनता पार्टीत नेमक्या कोणत्या पदावर होते ते समजू शकलेलं नाही. पक्षानेही याबाबत माहिती दिली नाही.
आयआयटीच्या आवारात विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार
पीडित विद्यार्थिनी २ नोव्हेंबर रोजी आयआयटी बीएचयूच्या न्यू गर्ल्स हॉस्टेलमधून रात्री दिडच्या सुमारास शतपावली करण्यासाठी बाहेर पडली होती. त्यानंतर ती वाटेत एका मित्राला भेटली. हे दोघे काही अंतर चालत गेले. त्याचवेळी एका दुचाकीवरून तीन अज्ञात तरुण आयआयटीच्या कॅम्समध्ये घुसले. त्यांनी दोन्ही विद्यार्थ्यांना एकमेकांपासून वेगळं केलं. त्यानंतर या तरुणांनी विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केले.
हे ही वाचा >> “स्वतःचा सत्यानाश…”, संजय राऊतांच्या पंतप्रधानांवरील टीकेनंतर काँग्रेसचा टोला; म्हणाले, “अशा राजकारण्यांमुळे…”
पीडित विद्यार्थिनीने पोलीस तक्रारीत म्हटलं आहे की, या नराधमांनी तिला तिच्या मित्रापासून लांब नेलं आणि धमकावलं. त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवून तिला विवस्त्र केलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. हे सगळं करत असताना त्यांच्यातला एकजण व्हिडीओ चित्रीत करत होता. या तरुणांनी विद्यार्थिनीचा फोन नंबरदेखील घेतला. तब्बल १० ते १५ मिनिटे हा सगळा प्रकार चालू होता. काही वेळाने हे तिघे तिथून पळून गेले. त्याच रात्री विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार लंका पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३५४ (ख), ५०६ आणि ६६ आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तब्बल ६० दिवसांनी पोलिसांनी या प्रकरणातील तिन्ही आरोपींना पकडलं आहे.