आयआयटी बीएचयूमध्ये दोन महिन्यांपूर्वी झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी सर्व आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. बलात्काराच्या घटनेनंतर आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांना तब्बल ६० दिवस लागले. तीन तरुण २ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दुचाकीवरून आले आणि आयआयटीच्या परिसरात घुसले. त्यानंतर या तरुणांनी बंदुकीचा धाक दाखवून एका विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केले. त्यांनी विद्यार्थिनीला कपडे काढायला सांगितले. आरोपींनी तिचे कपडे काढतानाचा व्हिडीओ चित्रित केला. या घटनेनंतर आयआयटीच्या कॅम्पसमध्ये सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची मागणी केली जात आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी निदर्शने केली होती.

या प्रकरणात पोलिसांनी पकडलेले तिन्ही आरोपी वाराणसीतले रहिवासी आहेत. हे तिघे ज्या दुचाकीवरून कॅम्पसमध्ये घुसले होते ती दुचाकीदेखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. कुणाल पांडेय, अभिषेक चौहान, सक्षम पटेल अशी या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.

पीडित विद्यार्थिनी २ नोव्हेंबर रोजी न्यू गर्ल्स हॉस्टेलमधून रात्री दिडच्या सुमारास शतपावली करण्यासाठी बाहेर पडली होती. त्यानंतर ती वाटेत एका मित्राला भेटली. त्याच्याबरोबर काही अंतर चालत गेली. त्याचवेळी एका दुचाकीवरून तीन अज्ञात तरुण आयआयटीच्या कॅम्समध्ये घुसले. त्यांनी दोन्ही विद्यार्थ्यांना वेगळं केलं. त्यानंतर या तरुणांनी विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केले.

पीडित विद्यार्थिनीने सांगितलं की या नराधमांनी त्या दोघांना एकमेकांपासून दूर नेलं आणि धमकावलं. त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवून तिला विवस्त्र केलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. हे सगळं करत असताना त्यांच्यातला एकजण व्हिडीओ रेकॉर्डिंग करत होता. या तरुणांनी विद्यार्थिनीचा फोन नंबरदेखील घेतला. तब्बल १० ते १५ मिनिटे हा सगळा प्रकार चालू होता. त्यानंतर हे तिन्ही नराधम तिथून पळून गेले. त्याच रात्री विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार लंका पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३५४ (ख), ५०६ आणि ६६ आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

हे ही वाचा >> “बाहुबलीकडून मिळणारा…”, विनेश फोगाटच्या पुरस्कारवापसीवरून राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना टोला

पोलीस तक्रारीनंतर आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी अनेक दिवस कॅम्पसमध्ये ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर विद्यार्थी रस्त्यावर उतरले. पोलिसांनी विनयभंग, सामूहिक बलात्कार (कलम ३७६ ड), इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करून लैंगिक छळ (कलम ५०९) आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. विद्यार्थिनीने पोलिसांत लिखित तक्रार दाखल केली, तसेच दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.

Story img Loader