IIT Delhi Student Died: फेब्रुवारी महिन्यात एमटेकच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा हॉस्टेलच्या खोलीत संशयास्पद मृत्यू ओढवला होता. त्याच्या पालकांनी मुलाची हत्या झाल्याचा आरोप केला होता. आता दिल्लीच्या आयआयटी हॉस्टेलमध्ये पदव्युत्तर पदविकेच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा हॉस्टेलमधील त्याच्या खोलीत संशयास्पदरीत्या मृत्यू झाला आहे. यामुळे दिल्ली आयआयटीमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांना यात आत्महत्येचा संशय असून हत्येची शक्यता पोलिसांनी फेटाळून लावली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी त्यांना पोलीस स्थानकात दिल्ली आयआयटी हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची माहिती देणारा फोन आला. हा विद्यार्थी झारखंडचा रहिवासी असून रात्री ११ च्या सुमारास पोलिसांना फोन आला होता. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. “खोली आतल्या बाजूने बंद होती. पण या विद्यार्थ्याचे मित्र व आयआयटीच्या कर्मचाऱ्यांनी दरवाज्याची खिडकी तोडली आणि नंतर दरवाजा उघडून आत प्रवेश केला”, अशी माहिती पोलिसांनी इंडियन एक्सप्रेसला दिली आहे.
रुग्णालयात दाखल करण्याआधीच विद्यार्थ्याचा मृत्यू
“संबंधितांनी विद्यार्थ्याला तातडीने आयआयटी रुग्णालयात दाखल केलं. तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. तिथून त्याला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आली. पण तिथल्या डॉक्टरांनीही त्याचा रुग्णालयात आणण्याआधीच मृत्यू झाल्याचा निर्वाळा दिला. सदर विद्यार्थ्याचा मृतदेह रुग्णालयात सुरक्षित ठेवण्यात आला असून त्याच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे. त्याच्या खोलीचीही झडती घेण्यात आली आहे”, अशी माहितीही संबंधित तपास अधिकाऱ्यांनी दिली.
सदर विद्यार्थ्यानं त्याच दिवशी आयआयटी कॅम्पसमधील रुग्णालयात मानसिक तणावासंदर्भातले उपचार घेतले होते, अशी माहिती आता समोर येत आहे. “आम्हाला त्याच्याजवळ किंवा हॉस्टेलच्या खोलीत कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. मृत विद्यार्थ्याच्या वैद्यकीय अहवालानुसार, तो मानसिक तणावाचे उपचार घेत होता. २२ ऑक्टोबर रोजी त्यानं यासाठी आयआयटी कॅम्पसमधील रुग्णालयात उपचार घेतले होते. तसेच, २९ तारखेची मानसोपचार तज्ज्ञांची अपॉइंटमेंटही त्यानं घेतली होती. त्याच्या मित्रांचे जबाब नोंदवण्यात आले असून हत्या वगैरे झाल्याची शक्यता नाही”, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
सासरच्या जाचाला कंटाळलेल्या जावयानं सुटकेसाठी थेट लॉरेन्स बिश्नोईचं घेतलं नाव; पोलीसही चक्रावले!
आयआयटीकडून निवेदन जारी
दरम्यान, आयआयटी दिल्लीचे डीन बी. के. पाणीग्रही यांनी या घटनेनंतर निवेदन जारी केलं आहे. “आपण सतत एकमेकांच्या मदतीसाठी तत्पर असायला हवं, हे अशा आव्हानात्मक वेळी पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. आमची विनंती आहे की जर तुम्हाला कोणताही तणाव जाणवत असेल, तर तुम्ही आपल्या व्यवस्थेमधील समुपदेशन केंद्राला भेट द्या”, अशी प्रतिक्रिया डीन पाणीग्रही यांनी दिली आहे.