राजस्थानमधील सिकर परिसरातील एका कोचिंग क्लासच्या संचालकाने आयआयटीच्या संयुक्त प्रवेश परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्या प्रित्यर्थ क्लासमधील विद्यार्थ्याला अलिशान बीएमडब्ल्यू बक्षिस दिली. ‘समर्पण इन्स्टिट्यूट’चे डॉ. आर. एल. पूनिया यांनी दोन वर्षांपूर्वी खरेदी केलेली ही अलिशान गाडी तन्मय शेखावत या आपल्या विद्यार्थ्यास बक्षिस म्हणून दिली. कारची किंमत जवळजवळ २८ लाख रुपये इतकी असून, आपल्या भावना व्यक्त करताना तन्मय म्हणाला की, IIT-JEE मध्ये टॉप-२० मध्ये येणाऱ्या क्लासमधील विद्यार्थ्यास आपली बीएमडब्ल्यू बक्षिस देणार असल्याचे इन्स्टिट्यूटच्या संचालकांनी सांगितले होते. त्यांनी आपला शब्द पाळला असल्याचेदेखील तो म्हणाला.
परीक्षेत ११ वे स्थान प्राप्त करणाऱ्या तन्मयला ही कार घेण्याची इच्छा नव्हती. ज्या गुरुंनी आपल्याला शिकवले, ज्यांच्यामुळे आपण हे यश प्रप्त करु शकलो त्यांच्याकडून ही कार घेण्यापेक्षा त्यांना गुरुदक्षिणा देणे जास्त योग्य ठरले असते असे तन्मय विनम्रपणे म्हणाला. तन्मयला आयआयटी मुंबईमधून कॉम्प्यूटर सायन्सचे शिक्षण घ्यायचे आहे. त्याचे वडील सरकारी शाळेत जीवशास्त्राचे शिक्षक आहेत. तन्मयच्या कुटुंबियांकडे कोणतेही वाहन नव्हते. परंतु, आता तन्मय गाडी चालवायला शिकेल अशी भावना त्याच्या कुटुंबियांनी व्यक्त केली.
यावर्षी आयआयटी जेईई अॅडव्हान्स निकालात राजस्थानच्या विद्यार्थ्याचा दबदबा राहिला. पहिल्या स्थानावर जयपूरचा अमन बन्सल, तर तिसऱ्या स्थानावर जयपूरचाच कुणाल गोयल असून, कोटामध्ये शिक्षण घेणारी रिया सिंग मुलींमध्ये टॉपर राहिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा