आयआयटी कानपूरचे वरिष्ठ प्राध्यापक ५३ वर्षीय समीर खांडेकर माजी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात आरोग्याच्या विषयावर व्याख्यान देत असतानाच हृदयविकाराचा झटका येऊन खाली कोसळले. त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे शुक्रवारी डॉक्टरांनी सांगितले. आयआयटी कानपूरच्या मॅकेनिकल इंजिनीयरिंग विभागाचे प्रमुख या पदांवर प्राध्यापक खांडेकर कार्यरत होते. सदर व्याख्यानासाठी माजी विद्यार्थी जमले होते. या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, खाली कोसळण्याआधी प्रा. खांडेकर यांनी “तुम्ही सर्वांनी आरोग्याची काळजी घ्या”, असे वाक्य उच्चारले होते.
या व्याख्यानाला उपस्थित असलेल्या आणखी काही विद्यार्थ्यांनी सांगितले की, प्रा. खांडेकर बोलत असताना त्यांचा आवाज अडखळत होता. मंचावर कोसळण्यापूर्वी ते घामाघूम झाले होते. खाली बसल्यानंतर उपस्थितांना वाटले की, ते बोलता बोलता भावनेच्या भरात खाली बसले आहेत. मात्र काही क्षण त्यांची कोणतीही हालचाल दिसून न आल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तिथे पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हे वाचा >> ह्रदय विकार टाळण्यासाठी तुमच्या जीवनशैलीत करा हे ५ बदल
२०१९ पासून आरोग्याशी संबंधित त्रास
प्रा. खांडेकर यांना २०१९ पासून कोलेस्ट्रॉलशी संबंधित आरोग्याचा त्रास सुरू होता. तेव्हापासून त्यांच्यावर उपचारही सुरू होते. शैक्षणिक कार्यापलीकडे जाऊन प्रा. खांडेकर संस्थेच्या इतर कामात योगदान देत असत. विशेषतः विद्यार्थांशी त्यांचा चांगला संवाद होता. ही घटना घडण्याच्या काही दिवस आधीच त्यांनी विद्यार्थ्यांसह सोपान आश्रमाला भेट दिली होती.
आणखी वाचा >> Heart Attack In Winter : हिवाळ्यात का वाढते हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण? वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
जबलपूरमध्ये जन्म, कानपूरमध्ये शिक्षण
प्रा. समीर खांडेकर यांचा जन्म १० नोव्हेंबर १९७१ साली मध्य प्रदेशच्या जबलपूर येथे झाला होता. २००० साली त्यांनी आयआयटी कानपूर येथून बी.टेक आणि २००४ साली जर्मनीमधून पीएचडी संपादन केली होती. २००४ सालीच त्यांनी आयआयटी कानपूरमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून कामाला सुरुवात केली. त्यानंतर २००९ साली सहयोगी प्राध्यापक आणि २०१४ साली ते प्राध्यापक बनले. २०२० साली त्यांच्याकडे मॅकेनिकल इंजीनियरिंग विभागाचे प्रमुखपद सोपविण्यात आले होते.
प्रा. समीर खांडेकर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक मुलगा असे कुटुंब आहे.