आयआयटीमधील संचालक निवडीवरून मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि आयआयटी प्रशासनामध्ये सुरू असलेल्या वादामुळे डॉ. अनिल काकोडकर यांनी निवड समितीतून राजीनामा दिला आहे. मुंबई आयआयटी गव्हर्नस बोर्डाच्या प्रमुखपदी असलेल्या डॉ. काकोडकर यांनी पटना, भुवनेश्वर आणि रोपर येथील आयआयटीच्या संचालकपदासाठी सुरू असलेल्या निवडप्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर आपला राजीनामा सादर केला. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी निवड समितीच्या अध्यक्षपदी आहेत. आयआयटीच्या निवड आणि स्थायी समितीचे सदस्य असणाऱ्या काकोडकरांनी १२ मार्च रोजी संचालक निवडीच्या प्रक्रियेबद्दल नाराजी व्यक्त करत राजीनामा दिल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनूसार पटना, भुवनेश्वर आणि रोपर या आयआयटी संस्थांच्या संचालकपदासाठी ३७ अंतिम उमेदवारांची निवड करण्यात आली होती. त्यामधून निवडलेल्या १२ उमेदवारांना १६ फेब्रुवारीसाठी मुलाखतीसाठी बोलविण्यात आले होते. यापैकी पटना आणि भुवनेश्वर येथील उमेदवारांच्या निवडीबद्दल समितीतील सदस्यांचे एकमत झाले होते. मात्र, रोपर आयआयटीच्या उमेदवारांसंदर्भात निवड समितीचे एकमत होते नव्हते. त्यानंतर ज्या १२ सदस्यांना मुलाखतीसाठी बोलविण्यात आले होते, ती संपूर्ण प्रक्रियाच रद्द करण्यात आली. त्याऐवजी अगोदरच्या सर्व ३७ जणांना मुलाखतीसाठी बोलविण्यात आले. या सगळ्याला डॉ. अनिल काकोडकर आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यातील वादाची किनार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. डॉ. काकोडकरांना या राजीनाम्याचे कारण विचारले असता त्यांनी, मी जवळजवळ नऊ वर्ष या पदावर काम केले आहे. आयुष्यात मला आणखी खूप काही करायचे आहे, त्यामुळेच राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.
स्मृती इराणी यांनीही डॉ. काकोडकर आणि आपल्यात कुठल्याही प्रकारचे मतभेद असल्याचे नाकारले आहे. डॉ. काकोडकर हे आयआयटीचे सन्मानीय सदस्य आहेत. येत्या मे महिन्यात त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यानंतर माझ्या विनंतीवरून डॉ. काकोडकर यापुढेही त्यांच्या पदावर कार्यरत राहतील. मात्र, काहीजण माझ्या खात्यातील कामाविषयी गैरसमज पसरवत असल्याचे स्मृती इराणी यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iit vs hrd again anil kakodkar quits iit b board over directors selection