Varun Vummadi On Indian Engineers : सॅन फ्रान्सिस्कोस्थित टेक कंपनी गिगा एमएलचे सह-संस्थापक वरुण वुम्मादी यांनी भारतीय इंजीनिअर्सवर टीका करत, दावा केला आहे की, ते जास्त पगार देऊनही कठोर परिश्रम करण्यास तयार नसतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, त्यांच्या कंपनीच्या भारतीय कार्यालयासाठी भरती करणे कठीण झाले आहे. कारण बहुतेक इंजीनिअर्स त्यांना वर्षाला एक कोटी रुपये किंवा त्याहून अधिक पगार दिला तरी ते आठवड्यातून सहा दिवस काम करण्यास नाखूष आहेत.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

वरुण वुम्मादी यांची पोस्ट

आयआयटी खरगपूरचे माजी विद्यार्थी असलेले वुम्मादी यांनी भारतीय इंजीनिअर्स, विशेषतः ज्यांना तीन ते आठ वर्षांचा अनुभव आहे, त्यांच्या कामाच्या पद्धतीवर निराशा व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “आमच्या भारतातील कार्यालयात इंजीनिअर्स नियुक्त करताना मला एक प्रकार आढळला आहे. १ कोटी रुपये मूळ पगार देऊनही, बरेच जण कठोर परिश्रम करण्यास तयार नाहीत. ३-८ वर्षांचा अनुभव असलेले इंजीनिअर्स आठवड्यातून सहा दिवस काम करण्यास तयार नाहीत.”

वुम्मादी यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. एक्सवरील अनेक युजर्सनी भारतीय इंजीनिअर्सचा बचाव करत म्हटले की, इंजीनिअर्सनी आठवड्यातून सहा दिवस काम करण्याची अपेक्षा करणे अन्याय आहे.

सोशल मीडियावर वाद

“तुम्ही वेडे लोक खरेदी करू शकत नाही. ते पैशाची कदर करतात, त्याची पूजा करत नाहीत!”, असे एका युजरने लिहिले. वुम्मादी यांनी याला उत्तर देत म्हटले की, “सॅन फ्रान्सिस्कोमध्ये तुम्ही वेडे लोक नियुक्त करू शकत नाही. पण भारतात तुम्ही ते करू शकता – भारतातील बहुतेक वेडे इंजीनिअर्स उच्च पगाराने प्रेरित असतात.”

पुढे अमन नावाच्या युजरने म्हटले की, “२६-३२ वयोगटातील बरेच लोक त्यांच्या आयुष्यात दोन दिवसांचा वीकेंड पसंत करतात यावर टीका करणे विचित्र आहे. मला ते अगदी सामान्य वाटते.”

कर्मचाऱ्यांनी जास्त वेळ काम करावे अशी इच्छा व्यक्त केल्याबद्दल अनेकांनी वुम्मादी यांच्यावर टीका केली आहे. काहींनी त्यांच्या मतांची तुलना एल अँड टीच्या अध्यक्षांशी केली आहे, ज्यांनी काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांनी रविवारीही काम करावे असे म्हटल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.

“लोकांना अखेर आरोग्याला सर्वांपेक्षा प्राधान्य देण्याचे महत्त्व कळू लागले आहे,” असेही एका युजरने म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iitian ceo criticises indian techies 6 day workweek rs 1 cr salary aam