Illegal Entry In US : बेकायदेशीर मार्गाने अमेरिकेत घुसखोरी करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. वर्षभरात जवळपास ९० हजार भारतीयांना बेकायदेशीर मार्गाने अमेरिकेत घुसण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे. या ९० हजार भारतीयांपैकी सर्वाधिक लोक हे गुजरात राज्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. यूएस कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शनच्या (यूएस-सीबीपी) आकडेवारीनुसार, अमेरिकेच्या सीमेवर दर तासाला १० भारतीयांना अटक करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यूएस कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शने (यूएस-सीबीपी) काही दिवसांपूर्वी एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार भारतामधून आणि विशेषतः गुजरात राज्यातून बेकायदेशीर मार्गाने स्थलांतर करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. २०२४ या आर्थिक वर्षात १ ऑक्टोबर २०२३ ते ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत अंदाजे ९० हजार ४१५ भारतीयांना अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना अटक करण्यात आली. दरम्यान, यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

हेही वाचा : Son Kills Mother: वीस हजारांसाठी जन्मदात्या माऊलीचा खून; मित्रांनी आईचे हात धरले, मुलानं वीट घेतली आणि…

दरम्यान, अहवालानुसार गेल्या वर्षभरात बेकायदेशीर मार्गाने अमेरिकेत घुसखोरी करणाऱ्या भारतीयांच्या संख्येची सरासरी काढली तर प्रत्येक तासाला १० जणांना अटक करण्यात आली. या अटक करण्यात आलेल्यांपैकी ४३,७६४ जणांना यूएस-कॅनडा सीमेवरवरून ताब्यात घेण्यात आलं. यामध्ये पकडण्यात आलेल्या भारतीय नागरिकांची संख्या सर्वाधिक असून या सीमेवर पकडल्या गेलेल्या भारतीयांचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे.

या अहवालाच्या माध्यमातून हे देखील स्पष्ट झालं की, सर्वात जास्त लोक मेक्सिकोऐवजी कॅनडामधून बेकायदेशीर मार्गाने अमेरिकेत घुसखोरी करण्याचा मार्ग निवडतात. दरम्यान, अमेरिकेच्या सीमेवर बेकायदेशीरपणे पकडल्या जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येत मागील काही वर्षांच्या तुलनेत किंचित घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. मात्र, तरीही ही संख्या जास्त प्रमाणात आहे.

तज्ज्ञांच्या मते मेक्सिकोमार्गे सीमा ओलांडण्याचे प्रमाण कमी होण्याचे कारण तुर्की आणि दुबई सारख्या देशांमध्ये वाढलेली देखरेख आहे. यूएस अधिकाऱ्यांनी केलेल्या निरीक्षणामध्ये अनेक भारतीय नागरिक विशेषत: गुजराती, आता कॅनेडियन मार्ग निवडत आहेत. जो त्यांना तुलनेने कमी जोखमीचा वाटतो. बरेच लोक यूएसमध्ये जाण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी अभ्यागत व्हिसावर कॅनडामध्ये प्रवेश करतात. सामान्यतः स्थानिक टॅक्सीद्वारे वाहतूक करतात. दरम्यान, भारतातून अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतराची परिस्थितीच्या आकडेवारीत काही प्रमाणात बदल होत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal entry in us 90 000 indians who entered america illegally during the year were arrested gkt
Show comments