Iltija Mufti : जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा मुफ्ती यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत हिंदुत्व हा एक आजार आहे असं म्हटलं आहे. या पोस्टमुळे इल्तिजा मुफ्ती ( Iltija Mufti ) चर्चेत आल्या आहेत. तसंच त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीकाही होते आहे.
काय म्हटलं आहे इल्तिजा मुफ्ती यांनी?
इल्तिजा मुफ्ती यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा रतलाम येथील व्हायरल व्हिडीओ आहे. याबाबत त्या म्हणतात, “हे सगळं पाहून प्रभू रामही मान झुकवतील. प्रभू रामही हेच म्हणतील की माझं नाव घेऊ नका. या अल्पवयीन मुस्लिम मुलांना फक्त यासाठी मारलं जातं आहे की त्यांनी रामाचं नाव घेतलं नाही. हिंदुत्व हा एक आजार आहे. या आजाराने लाखो भारतीयांना ग्रासलं आहे. तसंच प्रभू रामाचं नाव कलंकित केलं आहे.” या आशयाची पोस्ट इल्तिजा मुफ्ती ( Iltija Mufti ) यांनी लिहिली आहे.
इल्तिजा मुफ्ती यांच्या हे वक्तव्य केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर प्रचंड टीका होते आहे. काही लोकांनी इल्तिजा मुफ्तींना पाठिंबा दिला असून त्यांचं म्हणणं योग्य आहे असं म्हटलं आहे. तर काही लोक इल्तिजा मुफ्ती राजकीय अजेंडा चालवत आहेत असं म्हटलं आहे. दरम्यान इल्तिजा मुफ्ती यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. रतलामचा व्हायरल व्हिडीओ हा अत्यंत वेदनादायी आहे असं इल्तिजा मुफ्तींनी म्हटलं आहे.
काय म्हणाल्या इल्तिजा मुफ्ती?
”एका माणसाने मुस्लीम मुलांना चपलेने मारलं आहे. अत्यंत अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे. त्यामुळे मी ही पोस्ट केली आहे. मागच्या १० वर्षांपासून मुस्लिमांवर हल्ले होत आहेत. त्यांच्या विरोधात हिंसा वाढली आहे, मॉब लिंचिंगच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीत. रामाचं नाव घेतलं नाही म्हणून लहान मुलांना बडवलं जातं आहे. मारहाण करणारे लोक तेच आहेत जे म्हणत आहे की हे रामराज्य आहे. मात्र हे कुठलं रामराज्य आहे जिथे मुस्लिम मुलांना यासाठी मारहाण होते आहे की त्यांनी रामाचं नाव घेतलं नाही.” असं इल्तिजा मुफ्ती ( Iltija Mufti ) म्हणाल्या.
कुणालाही भडकवण्याचा उद्देश नाही
इल्तिजा मुफ्ती ( Iltija Mufti ) पुढे म्हणाल्या, मला कुणालाही भडकवण्याचा उद्देश नाही. मात्र अशा घटना घडल्या तर मी शांत कशी राहू? मुस्लिमांना मारहाण झाल्यावर तुमची अपेक्षा काय? मी गप्प बसलं पाहिजे का? हिंदुत्वामुळे सगळ्यांची विचारधारा विषारी झाली आहे. हिंदू लोक जास्त कट्टर झाले आहेत. हा एक आजार आहे. मुस्लिम असल्याने मी हे सांगू शकते दहशतवाद्यांनी ज्या प्रमाणे इस्लाम धर्माला बदनाम केलं तसंच आता हिंदुत्वाच्या नावाखाली हिंदू धर्माची बदनामी चालली आहे.