देशात करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने बाधित झालेल्यांची संख्या हळूहळू वाढू लागली असताना त्यासोबत आरोग्य यंत्रणेची चिंता देखील वाढू लागली आहे. नुकताच देशातील ५० टक्के लोकसंख्येला पूर्णपणे लसीकृत करण्याचा टप्पा भारतानं गाठला आहे. मात्र, अजूनही निम्म्या लोकसंख्येला पूर्ण लसीकृत करण्याचं आव्हान समोर असतानाच ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या भितीमुळे आरोग्य यंत्रणेसमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. या पार्श्वभूमीवर देशातील डॉक्टरांची शिखर संघटना असलेल्या आयएमएनं ओमायक्रॉन व्हेरिएंट आणि त्यासंदर्भात केंद्रानं करावयाच्या उपाययोजना याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. तसेच, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आयएमएनं विशेष मागणी देखील केली आहे.
“…तर भारताला तिसऱ्या लाटेचा मोठा फटका”
आयएमएनं दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ओमायक्रॉनसंदर्भा भूमिका स्पष्ट केल्याचं वृत्त टाईम्स नाऊनं दिलं आहे. “आत्ता कुठे भारतात परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली होती. मात्र, त्यात ओमायक्रॉन आल्यामुळे हा भारतासाठी मोठा धक्का आहे. जर आपण योग्य ती खबरदारी घेतली नाही, तर आपल्याला करोनाच्या तिसऱ्या लाटेचा मोठा फटका बसू शकतो”, असं आयएमएनं स्पष्ट केलं आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी केंद्राला साकडं!
दरम्यान, आयएमएनं देशातील आरोग्य क्षेत्रात काम करणारे कर्मचारी, डॉक्टर आणि इतर मनुष्यबळासाठी बूस्टर डोसची केंद्राकडे मागणी केली आहे. “या घडीला देशातील आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्यांना करोना लसीचा अतिरिक्त डोस घेण्याची परवानगी दिली जावी”, अशी मागणी IMA नं केली आहे. तसेच, देशातील निम्म्या लोकसंख्येला पूर्ण लसीकृत केल्याबद्दल आयएमएनं सरकारचं अभिनंदन देखील केलं आहे.
Omicron Variant : दक्षिण अफ्रिका ते भारत… कसा पसरला ओमायक्रॉन?
…तर भारत ओमायक्रॉनला पराभूत करू शकेल
ओमायक्रॉनच्या संकटाचा सामना कसा करावा, यावर जागतिक पातळीवर संशोधन सुरू असताना आयएमएनं त्यावर लसीकरण हा प्रभावी उपाय सांगितला आहे. “जर आपण पूर्ण लक्ष लसीकरणावर केंद्रीत केलं, तर ओमायक्रॉनच्या प्रभावापासून भारत स्वत:चं रक्षण करू शकेल. लसीकरणाशी संबंधित सर्वांना आयएमए आवाहन करतंय की सर्वांचं लसीकरण हेच ध्येय समोर ठेवून काम करावं. ज्यांच्यापर्यंत लसीकरण अद्याप पोहोचलेलं नाही आणि ज्या पात्र व्यक्तींनी फक्त एकच डोस घेतलाय, त्यांच्यापर्यंत यंत्रणेनं पोहोचावं”, असं आयएमएनं नमूद केलं आहे.
ओमायक्रॉन अफ्रिकेत सापडण्याआधीच ‘या’ देशात पोहोचला होता; नव्या अभ्यासातून आले धक्कादायक निष्कर्ष!
प्रवासबंदीचं काय?
ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळल्यानंतर आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत प्रवासबंदी लागू करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. मात्र, आयएमएनं त्याच्या उलट भूमिका घेतली आहे. “आयएमए प्रवासबंदी लागू करण्याचं समर्थन करत नाही. मात्र, विनाकारण प्रवास करू नये, असं मात्र आयएमएकडून आवाहन करण्यात येत आहे. विशेषत: पर्यटनासाठी किंवा सामाजिक कार्यक्रमांसाठी प्रवास करणं टाळायला हवं. आपल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेनं कोविडसंदर्भातल्या नियमावलीचं काटेकोरपणे पालन करायला हवं”, असं देखील नमूद करण्यात आलं आहे.