अयोध्या : अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या अभिषेक सोहळयासाठीची निमंत्रण पत्रिका निर्माणाधीन मंदिराच्या भव्यतेचे दर्शन घडवत आहे. निमंत्रण पत्रिकेवर मंदिराच्या भव्य छायाचित्रासह प्रभू रामाचे बालरूप समाविष्ट आहे. मोठया आकाराच्या आणि सुंदर डिझाइन केलेल्या निमंत्रण पत्रिकेत एक पुस्तिका देखील असून त्यात रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी असलेल्या काही प्रमुख व्यक्तींचा संक्षिप्त परिचय देण्यात आला आहे.
‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळयासाठी अयोध्येची सजावट केली जात आहे. या सोहळयात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र मंदिर ट्रस्टच्या निमंत्रित यादीत सात हजारांहून अधिक लोकांची नावे आहेत, ज्यात माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, क्रिकेटपटू विराट कोहली, अभिनेता अमिताभ बच्चन आणि उद्योगपती मुकेश अंबानी, गौतम अदानी यांचा समावेश आहे. पाहुण्यांना निमंत्रण पत्रिका पाठवली जात आहेत. अतिथींच्या यादीत मोठया संख्येने संत व काही परदेशी निमंत्रितांचाही समावेश आहे.
हेही वाचा >>> पंतप्रधानांकडून लक्षद्वीपमध्ये सागरतळाच्या सफरीचा आनंद; विविध छायाचित्रे प्रसृत
मुख्य निमंत्रण पत्रिकेच्या मुखपृष्ठावर ‘अपूर्व अनादिक निमंत्रण’ (हिंदी) देखील छापलेले आहे. त्यात ‘प्राण प्रतिष्ठे’चा ‘शुभ मुहूर्त’ दुपारी १२ वाजून २० मिनिटे असाही उल्लेख आहे. ‘रामायण’ या मालिकेत भगवान राम आणि देवी सीता यांच्या भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
निमंत्रण पत्रिका हिंदी-इंग्रजीत
‘निमंत्रण पत्रिका हिंदूी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये छापण्यात आल्या आहेत.’असे ट्रस्टच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले. प्रत्येक निमंत्रण पत्रिकेत मुख्य निमंत्रण पत्रिका, ‘प्राण प्रतिष्ठा’ कार्यक्रमाचे कार्ड, रामजन्मभूमी चळवळीच्या प्रवासाची ओळख करून देणारी पुस्तिका आणि त्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भूमिका बजावलेल्या लोकांचा समावेश आहे. मुख्य निमंत्रण पत्रिकेच्या मुखपृष्ठावर राम मंदिराची प्रतिमा असून त्याखाली ‘श्री राम धाम’ आणि त्याखाली ‘अयोध्या’ छापण्यात आले आहे.
अयोध्येत पतंग महोत्सवाचे आयोजन
* येत्या २२ जानेवारीला होणाऱ्या अयोध्येच्या राममंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळयापूर्वी उत्तर प्रदेश सरकार या शहरात आंतरराष्ट्रीय पतंग मेळा भरवणार आहे.
* संभवत: १९ ते २१ जानेवारीदरम्यान होणाऱ्या या महोत्सवाची तयारी अयोध्या विकास प्राधिकरणाने सुरू केली आहे. देशातील आणि जगभरातील प्रख्यात पतंगबाजांना या महोत्सवात त्यांचे कलाकौशल्य दाखवण्याची संधी मिळेल, असे गुरुवारी जारी केलेल्या एका अधिकृत प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
* हा महोत्सव मोठया प्रमाणावर आयोजित करण्यासाठी देशात व जगभरात आयोजित होणाऱ्या निरनिराळया पतंग महोत्सवांपासून प्रेरणा घेण्यात आली असल्याचेही यात नमूद केले आहे.
अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या अभिषेक सोहळयासाठीची निमंत्रण पत्रिका निर्माणाधीन मंदिराच्या भव्यतेचे दर्शन घडवत आहे. मंदिर ट्रस्टच्या निमंत्रित यादीत सात हजारांहून अधिक लोकांची नावे आहेत.