एकीकडे देशभर मणिपूरमधील हिंसाचारामुळे वातावरण तापलं असताना आता हरयाणामध्ये घडलेल्या एका घटनेमुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. हरयाणाच्या गुरगावमधल्या सेक्टर ५७मध्ये एका मशिदीला जमावाने आग लावल्याची घटना घडली आहे. सोमवारी अर्थात ३१ दुलै रोजी मध्यरात्री हा प्रकार घडला असून यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अंदूमन जामा मशिदीत ही घटना घडली असून आसपासच्या परिसरात पोलिसांनी कर्फ्यू लागू केला आहे.
नेमकं काय घडलं?
गुरगावचे पोलीस उपायुक्त नितीश अग्रवाल यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास सेक्टर ५७ मधील अंजूमन जामा मशिदीला सुमारे ७० ते ८० जणांच्या जमावाने आग लावली. यानंतर आरोपींनी अंदाधुंद गोळीबारही सुरू केला. या संपूर्ण घटनेत मशिदीतील नायब इमाम आणि त्यांच्यासह इतर एक व्यक्ती गंभीर जखमी झाली होती. नायम इमाम यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. रुग्णालयात उपचारांदरम्यान नायब इमाम यांचा मृत्यू झाला आहे.
आरोपींची ओळख पटली!
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातल्या काही आरोपींची ओळख पटली असून त्यांच्या अटकेसाठी तातडीने पावले उचलण्यात आली आहेत. यासंदर्भात रात्रभर पोलिसांकडून आरोपींना अटक करण्यासाठी ठिकठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. यातल्या काही हल्लेखोरांना पकडण्यातही पोलिसांना यश आलं आहे.
प्रार्थनास्थळांची सुरक्षा वाढवली
दरम्यान, अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी या परिसरातील व आसपासच्या भागातील प्रार्थनास्थळांची सुरक्षा वाढवली आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही बाजूच्या नेतेमंडळींशी पोलीस चर्चा करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, नुह, सोहना, पतौडी, मानेसर या भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.
VIDEO : हरियाणात दोन गटात राडा, दोघांचा मृत्यू, ७ जण जखमी; गाड्यांची जाळपोळ
घटनेच्या काही तास आधीच नुहमध्ये हिंसाचार
इंडियन एक्स्प्रेसनं पीटीआयच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना घडण्याच्या काही तास आधीच इथल्या नुह परिसरात विश्वहिंदू परिषद व बजरंग दलाकडून मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चादरम्यान, झालेल्या वादावादीत तीन व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यामध्ये दोन होम गार्ड्सचाही समावेश होता. यानंतर नुहमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आल्याची माहिती हरयाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी दिली आहे.