केरळमध्ये मान्सून वेळेआधी येईल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. ३१ मे पर्यंत केरळच्या किनारपट्टीवर मान्सून सरी बरसतील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. दरवर्षी केरळमध्ये १ जूननंतर मान्सूनच्या सरी बरसतात. मात्र यंदा नैऋत्य मोसमी वारे वेळेआधी किनारपट्टीवर येतील असं सांगण्यात येत आहे.

नव्या अंदाजानुसार अंदमान बेटांवर मान्सूनच्या सरी २२ मे रोजी बरसतील. त्यानंतर मान्सूनचा प्रवास सुरु होते केरळमध्ये ३१ मे पर्यंत येईल अर्थात मान्सून वेळेआधी केरळमध्ये दाखल होईल असं सांगण्यात येत आहे. अंदमानमध्ये सरी कोसळल्यानंतर ७ दिवसात मान्सून केरळ किनारपट्टीवर पोहोचतो.

यंदा सरासरीच्या ९८ टक्के अर्थात समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यासंदर्भातलं परिपत्रक हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलं असून त्यामध्ये याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पॅसिफिक महासागर आणि हिंद महासागर यामध्ये होणाऱ्या अनुकूल बदलांमुळे भारतात मान्सून समाधानकारक राहणार असल्याचा हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Cyclone Tauktae: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज; कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी

पावसाचं प्रमाण कसं ठरवलं जातं?

केंद्रीय हवामान विभागाकडून पावसाचं प्रमाण सामान्य आहे, कमी आहे किंवा जास्त आहे हे ठरवण्याचे काही मापदंड ठरवण्यात आले आहेत. त्यानुसार सरासरीच्या ९० टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज असेल, तर ते प्रमाण कमी मानलं जातं. सरासरीच्या ९० ते ९६ टक्क्यांच्या मध्ये पावसाचा अंदाज असेल, तर ते प्रमाण सामान्यपेक्षा कमी असं मानलं जातं. सरासरीच्या ९६ ते १०४ टक्क्यांमध्ये पावसाचा अंदाज असेल, तर ते प्रमाण सामान्य मानलं जातं. हेच प्रमाण १०४ ते ११० टक्क्यांच्या मध्ये असल्यास ते प्रमाण सामान्यहून अधिक तर ११० टक्क्यांपेक्षाही जास्त असल्यास अतिवृष्टी मानली जाते.