वृत्तसंस्था, नवी दिल्ली/ अमृतसर

अमेरिकेतील बेकायदा भारतीय स्थलांतरितांना घेऊन येणारे विमान अमृतसरमध्ये उतरवण्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. हे विमान अमृतसरमध्येच का उतरवले जाते असा प्रश्न तेथील ‘आप’ सरकारने विचारला आहे. तर, भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील ‘आप’ सरकार राज्यातून होणाऱ्या बेकायदा स्थलांतराच्या समस्येवरून दुसरीकडे लक्ष वळवत असल्याचा आरोप भाजपने केला.

बेकायदा स्थलांतरितांना घेऊन येणारे विमान अमृतसरला उतरवणे हे पंजाबला बदनाम करण्याचे केंद्राचे षड्यंत्र आहे असा आरोप मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शुक्रवारी केला होता. या पवित्र शहराचे रुपांतर स्थलांतरितांना उतरवण्याच्या केंद्रात करू नका असे ते म्हणाले. शनिवारी त्यांनी तेथील विमानतळाला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. विमान उतरल्यानंतर पंजाबच्या रहिवाशांना त्यांच्या घरी पोहोचवण्याची सोय केल्याचे त्यांनी सांगितले.

मान यांच्या टीकेनंतर शनिवारी भाजपच्या नेत्यांनी उत्तर दिले. पंजाबच्या तरुणांना फसवून बाहेर पाठवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याऐवजी ‘आप’चे नेते राजकारण करत आहेत असा आरोप भाजप नेते तरुण चुघ यांनी केला. तर, अमृतसर हे अमेरिकेला विमान उतरवण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ आहे असा दावा भाजप नेते आर पी सिंह यांनी केला. काँग्रेसनेही मान यांच्यावर टीका केली आहे.

दोन्ही विमाने अमृतसरमध्ये

अमेरिकेतील ११९ बेकायदा स्थलांतरितांना घेऊन येणारे शनिवारी रात्री १० वाजता अमृतसरमध्ये उतरत आहे. त्यामध्ये ६७ स्थलांतरित पंजाबचे आणि ३३ हरियाणाचे आहेत. त्याशिवाय गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रातील बेकायदा स्थलांतरितांचाही त्यामध्ये समावेश आहे. यापूर्वी अमेरिकेतील १०४ बेकायदा स्थलांतरितांना घेऊन येणारे पहिले विमान ५ फेब्रुवारीला अमृतसरमध्येच उतरले होते. त्यामध्ये गुजरात व हरियाणाचे प्रत्येकी ३३ तर पंजाबचे ३० स्थलांतरित होते.

पंजाबच्या लोकांना हे जाणून घ्यायचे आहे की निरपराध तरुण देशाबाहेर का गेले? त्यांचे आयुष्य कोणी उद्ध्वस्त केले? त्यांना बेकायदा मार्गाने का प्रवास करावा लागला? – तरुण चुघ, भाजप नेते

पंजाबमधून मानवी तस्करी रोखण्यात मुख्यमंत्री भगवंत मान यांना अपयश आले आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये किती जणांविरोधात मानवी तस्करीचा गुन्हा किती जणांवर नोंदवण्यात आला? – प्रताप सिंग बाज्वा, विरोधी पक्षनेते

Story img Loader