दक्षिण मेक्सिकोतून विविध देशांच्या हजारो लोक गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेत स्थलांतर करत आहेत. संयुक्त राष्ट्रांची संस्था एजेन्सी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन (आयओएम) नुसार २०१४ पासून आजपर्यंत अमेरिका किंवा युरोपातल्या देशात पोहचण्याच्या नादात जवळपास ५० हजार अवैध स्थलांतरितांचा मृत्यू झाला आहे किंवा ते बेपत्ता झाले आहेत. हा आकडा यापेक्षा जास्त असू शकतो पण सर्वांत धोकादायक मार्गाने हे प्रवासी अमेरिकेत स्थलांतर करत असल्याचे समोर आले आहे. सुटकेस, पाण्याच्या रिकाम्या टाक्यांतून या स्थलांतरितांची अमेरिकेत तस्करी करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. अमेरिकेच्या तपास यंत्रणांनी याबाबत आरोपपत्रही सादर केलं आहे.

हेही वाचा- जम्मू काश्मीरमध्ये बसचा भीषण अपघात, ११ जणांचा मृत्यू, २५ जखमी

तस्करी प्रकरणी ८ अमेरिकन नागरिक दोषी

अमेरिकेचे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेकडो स्थलांतरितांची तस्करी करण्याच्या आरोपाखाली न्यायालयाने ८ अमेरिकन नागरिकांना दोषी ठरवलं आहे. या स्थलांतरितांना ट्रॅक्टरवर ठेवण्यात आलेल्या लाकडी क्रेटमध्ये लपवून अमेरिकेत आणले जात होते. या प्रकरणी आणखी सहा जणांवरही दोषपत्र दाखल करण्यात आलं आहे.

तस्करी मोहिमेअंतर्गत लाखो डॉलर्सची कमाई

अमेरिकेत “बॉस लेडी” म्हणून ओळखल्या जाणार्‍या ३१ वर्षीय एर्मिनिया सेरानो पिएड्राला यांना स्थलांतरितांना अवैध पद्धतीने अमेरिकेत आणण्याच्या मोहिमेच्या मुख्य सुत्रधार मानण्यात येत आहे. एर्मिनिया यांनी या मोहिमेअंतर्गत लाखो डॉलर्स कमवल्याचा आरोप करण्यात आला आहे. सेरानो पिएड्राने डिसेंबर २०१७ आणि ऑगस्ट २०२१ या कालावधीत दोन बँक खात्यांमध्ये १.३ दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त रुपये जमा केल्याचे समोर आले आहेत. मात्र, त्यांनी यापैकी अर्ध्यापेक्षा कमी पैशांचाच हिशोब दिला असल्याचा आरोप सरकारी वकिलांनी केला आहे.

हेही वाचा- साडे तीन वर्षाच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या बस चालकाच्या घरावर कारवाई, पोलीस आणि पालिकेने पाडलं घर

५३ स्थलांतरितांचा मृत्यू

जून २०२२ मध्ये स्थलातरितांच्या तस्करीच्या प्रयत्नादरम्यान, सॅन अँटोनियोमध्ये ५३ स्थलांतरितांचा ट्रॅक्टर ट्रेलरमध्ये अडकल्याने मृत्यू झाला होता. ट्रेलरमध्ये गुदमरुन त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. कोर्टात सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, मार्टिनेझने सांगितले की ड्रायव्हरला एअर कंडिशनरने काम करणे बंद केले आहे याबद्दल काहीच माहित नव्हते आणि याच चुकीमुळे लोकांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चालकासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थलांतरितांना मेक्सिको का सोडायचे?

‘एपी’ने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या अनेक महिन्यांपासून मेक्सिकोच्या स्थलांतरित प्रतिबंधक धोरणामुळे अमेरिकेपासून दूरवर असलेल्या मेक्सिकोच्या दक्षिण टोकाला स्थानबद्ध केल्याची या स्थलांतरितांची तक्रार आहे. तेथे त्यांना अत्यंत प्रतिकूलतेत व हलाखीत दिवस कंठावे लागत आहेत. स्थलांतर करताना त्यातील अनेकांचा खूप खर्च झाल्याने त्यांच्याकडील पैसे संपले आहेत. तपाचुला शहरात त्यांना रोजगाराच्या संधीही फारशा उपलब्ध नाहीत. मेक्सिकोत आलेल्या स्थलांतरितांनी आश्रयासाठी मानवतावादी दृष्टिकोनातून ‘व्हिसा’ मागितला आहे. मात्र, ‘अल जझिरा’ने दिलेल्या वृत्तानुसार, ही प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे या स्थलांतरितांना मेक्सिकोच्या दक्षिण टोकाकडील च्यापास राज्यातच थांबावे लागत आहे. येथे तपाचुला शहर आहे.