इंफाळ : रेमल चक्रीवादळामुळे मणिपूरला संततधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. इंफाळ खोऱ्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात तीन जणांचा मृत्यू झाला असून हजारो लोक बाधित झाले आहेत. शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. मणिपूरमधील पूरग्रस्त भागातून सुमारे एक हजार जणांची आसाम रायफल्सच्या जवानांनी सुटका केली आहे.
आसाम रायफल्सने एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या जवानांनी मंगळवारी इंफाळ शहरातील पूरग्रस्त भागात यशस्वीरित्या बचाव कार्य केले आणि पुरात सापडलेल्या आणि अडकलेल्या लोकांना मदत केली. सुमारे हजार स्थानिक लोकांना विनाशकारी पुराच्या पाण्यातून वाचवण्यात आले, असे निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा >>> २०६ प्रचारसभा घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींची ध्यानधारणा सुरू; कसे असतील पुढचे ४५ तास?
मुसळधार पावसानंतर पुराचे पाणी वाढल्याने अनेक लोक अडकले होते. आसाम रायफल्सने आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी स्वतंत्र पूर मदत पथके तैनात केली आहेत. पूर बचाव मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी ही आसाम रायफल्सच्या अतूट समर्पण, व्यावसायिकता आणि तत्परतेचा पुरावा आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
गुरुवारी हवामानात काही काळ सुधारणा झाल्यानंतर आसाम रायफल्सने जीवनावश्यक अन्नपदार्थ आणि पाणी वाटपाचे काम हाती घेतले.
पुरात तीन ठार, हजारो बाधित
इंफाळ खोऱ्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे तीन जणांचा मृत्यू झाला असून हजारो लोक बाधित झाले आहेत. अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. सेनापती जिल्ह्यातील थोंगलांग रस्त्यावर बुधवारी मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात एका ३४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सेनापती नदीत ८३ वर्षीय महिलेचा बुडून मृत्यू झाला. बुधवारी इंफाळमध्ये एक ७५ वर्षीय व्यक्ती पावसात विजेच्या खांबाच्या संपर्कात आली आणि विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला. इम्फाळ नदी दुथडी भरून वाहत असल्याने अनेक भागात पूर आला आहे आणि इम्फाळ खोऱ्यातील शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. खुमन लम्पक, नागराम, सगोलबंद, उरीपोक, केसमथोंग आणि पाओना भागांसह इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील किमान ८६ भागात नंबुल नदीमुळे पूर आल्याची माहिती आहे.